लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : खेळता खेळता घरातून बाहेर पडलेल्याआणि रस्ता चुकून महाड बाजारपेठेत भरकटलेल्या चार वर्षांच्या बालकाला समाज माध्यमाच्या प्रभावी वापरामुळे सुखरूपपणे त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात रविवारी महाड शहर पोलिसांना यश आले. शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे हे शक्य झाले.गिरी हे रविवारी सकाळी महाड बाजारपेठेमध्ये गस्त घालत असताना चार वर्षांचा एक बालक बाजारपेठेत भरकटल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी त्या बालकाची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला स्वत:चे नाव किंवा पत्ता सांगता येत नव्हता. बाजूला चौकशी करूनही त्याचे पालक आढळून न आल्यामुळे गिरी यांनी त्याला शहर पोलीस ठाण्यात आणले आणि त्याचा एक फोटो काढून तो विविध व्हॉट्स अॅप ग्रुपवर शेअर केला. चवदार तळे येथे एका व्यक्तीने या बालकाला ओळखले आणि त्याच्या पालकांशी संपर्क साधून, तुमचे मूल महाड शहर पोलीस ठाण्यात असल्याचे त्यांना कळविले. पालकांनी त्वरित शहर पोलीस ठाण्यात जाऊन आपले मूल ताब्यात घेतले.विराज शंकर शिर्के, असे या बालकाचे नाव असून तो आपल्या आईवडिलांसह चवदार तळे परिसरातच राहतो. रविवारी वडील कामाला गेल्यानंतर आणि आई आजारपणामुळे झोपली असता खेळता खेळता तो घरातून बाहेर पडला होता आणि रस्ता चुकून महाड बाजारपेठेत पोहोचला होता. सहायक पोलीस निरीक्षक गिरी यांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळेच या बालकाची आपल्या आईवडिलांशी पुनर्भेट झाली. स. पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांचे महाड शहरात कौतुक होत आहे.
हरवलेल्या मुलाची पालकांशी भेट, व्हॉट्सअॅपवर पाठवला होता मुलगा हरवल्याचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 6:40 AM