कळंबोली : तू कोणत्या कॉलेजला प्रवेश घेणार... अमुक कॉलेजची फी काय आहे... प्रवेश प्रक्रि या कधी सुरू होणार... मेरिट किती मार्कांना क्लोज होईल... प्रवेशाला कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत... असे अनेक प्रश्न सोमवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी एकमेकांना विचारत आहेत. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचीही महाविद्यालयीत प्रवेशासाठी धावपळ सुरू झाली आहे. शिक्षण आणि करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना वेध लागतात ते पुढील प्रवेशाचे. दहावीनंतर आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स असे पर्याय उपलब्ध आहेत. विशेषत: सायन्स, कॉमर्सला विद्यार्थ्यांचा कल अधिक दिसून येत आहे. बारावीनंतर अभियांत्रिकी आणि मेडिकलला जाण्याची अनेकांची इच्छा असल्यामुळे सायन्सकडे विद्यार्थ्यांचा अधिक ओढा दिसून येतो. त्याचबरोबर बारावीला मेरिटमध्ये न आल्याने कित्येकदा डिग्रीला प्रवेश मिळत नाही. म्हणून काही विद्यार्थी डिप्लोमाला प्रवेश घेतात. तीन वर्षांचा डिप्लोमा केल्यानंतर डिग्रीला प्रवेश मिळतो. त्यामुळे अनेकांनी डिप्लोमाचा पर्याय निवडला आहे. त्याकरिता कॉलेजचा शोध सुरू झाला आहे. सीकेटी आणि महात्मा या दोन ज्युनिअर कॉलेजला पसंती दिली जात आहे. याशिवाय व्ही. के. बांठिया, बान्स, सेंट जोसेफ या ठिकाणीही अकरावी आणि बारावीचे शिक्षण घेण्याची सोय आहे. कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, आॅटोमोबाइल, मॅकेनिकल, आयटी डिप्लोमाकरिता नवीन पनवेल येथील पिल्लाई खारघरमधील सरस्वती आदी पर्याय उपलब्ध आहेत. (वार्ताहर)
दहावीच्या निकालानंतर आता मिशन अॅडमिशन
By admin | Published: June 09, 2015 10:35 PM