- राजेश भाेस्तेकरअलिबाग : अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघावर अडीच वर्षांपूर्वी पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा गुलाल उधळणाऱ्या आमदार महेंद्र दळवी यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची कास धरली आहे. गुडघेदुखीचा प्रचंड त्रास असतानाही त्यांच्यासमवेत त्यांची सुरत-गुवाहाटी अशी ‘वारी’ सुरू आहे. ‘वाॅकर’ सोबत घेऊनच ते हा प्रवास करत आहेत.
दळवी यांच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पायावरील उपचारासाठी मंगळवारी त्यांनी मुंबईतील एका प्रसिद्ध डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती. मात्र, शिंदे यांच्यासमवेत सोमवारीपासून ते दौरा करत आहेत. रायगड जिल्ह्यात त्यांच्या बंडखोरीबरोबरच दुखऱ्या पायासह सुरू असलेली ‘पायपीट’ चर्चेचा विषय बनली आहे.
आमदार दळवी यांनी शिवसेनेच्या माध्यमातून २०१९ च्या निवडणुकीत शेकापचे वर्चस्व मोडीत काढून मतदारसंघावर भगवा फडकवला होता. अलिबाग-मुरुड मतदारसंघातील विकासकामांसाठी दळवी यांनी कोट्यवधींचा निधीही आणला आहे. बंडखोरीच्या काळात दळवी हे शिंदे यांच्यासोबत कायम राहिले आहेत. या बंडखोरीत रायगडचे दोन आमदारही शिंदेसोबत आहेत.
दळवी यांना गेली अनेक वर्षे पायाच्या गुडघ्याचे तीव्र दुखणे आहे. अनेक वर्षे ते या पायाच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांना चालताना आधाराची गरज असते. काही दिवसांपासून त्यांच्या पायावर मुंबई येथे उपचार सुरू आहेत. त्यामुळे आधीपेक्षा दुखणे काही प्रमाणात कमी झाले आहे. अशाही परिस्थितीत राज्यसभा निवडणुकीवेळीही पायाचे उपचार सुरू असताना मतदानाला उपस्थित राहिले होते. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीतही त्यांनी मतदान केले.