कर्जत : कर्जत, खालापूर तालुक्यातील हायब्रिड अॅन्युटीमध्ये मंजूर झालेली व महापुरात वाहून गेलेल्या रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण व्हावीत तसेच कोंढाणे धरण सिडकोला न देता कर्जत तालुक्यासाठी करण्यासाठी प्रशासनाच्या विरोधात आमदार सुरेश लाड यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मंगळवार, २७ आॅगस्टपासून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकात आमदार लाड उपोषणाला बसणार आहेत.
खालापूर तालुक्यातील सावरोली खारपाडा व कर्जत तालुक्यातील कर्जत, नेरळ या रस्त्याची कामे हायब्रिड अन्युटीमध्ये मंजूर होऊनही अद्याप पूर्ण झालेली नाहीत. अतिवृष्टीमुळे रस्त्याची अवस्था बिकट असून याठिकाणाहून वाहतूक करणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे चालकांसह नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना कसरत करावी लागते. मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे त्वरित व्हावीत, या मागणीसाठी १२ फेब्रुवारी रोजी आमदार लाड उपोषणाला बसले होते. त्यावेळी दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला असून संबंधित बांधकाम विभागाने कामांमध्ये अक्षम्य हलगर्जीपणा केल्यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे.कर्जत, खालापूर तालुक्यातील अनेक रस्त्यांची अतिवृष्टीमुळे दुर्दशा झाली असून भिवपुरी रोड, कडाव, कोंदिवडे, वदप या राज्यमार्गावरील व माले, चिकन पाडा या रस्त्यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
कर्जत तालुक्यात अनेक वर्षांपासून रखडलेल्या कोंढाणे धरण प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. या धरणाच्या पाण्यावर येथील जनजीवन अवलंबून आहे. म्हणून सिडकोमार्फत नैना प्रकल्पाला या धरणाचे पाणी देण्यास विरोध असून हे कोंढाणे धरण कर्जतसाठीच व्हावे, तसेच रस्त्यांची कामे पूर्ण व्हावीत या मागणीसाठी लाड उपोषणास बसणार आहेत.आमदारांनी उपोषणाचा इशारा देताच ठेकेदाराला जाग आली आणि त्याने रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी सोमवारी मशिनरी आणून त्वरित काम चालू करतो, असे सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगितले. हायब्रिड अॅन्युटीअंतर्गत सुमारे १४२ कोटीचे काम पी. पी. खारपाटील अँड सन्स या कंपनीने घेतले आहे, मात्र ही कंपनी रस्त्याचे काम करण्यास चालढकलपणा करीत होती. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत होता.
कर्जत तालुक्यातील कर्जत - डोणे या २१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यामधील डोणे ते वडवली या १२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आता फक्त वडवली ते भिसेगाव फाटा या ९ किलोमीटर रस्त्याचे काम बाकी आहे. मात्र आमदार सुरेश लाड यांनी या रस्त्याबाबत उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याने ठेकेदार कामाला लागला आहे. मंगळवारपासून काँक्रीटचे काम सुरू करतो असे सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवले आहे