राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: अलिबाग विधानसभा मतदार संघाचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांना उच्च न्यायालयात दिलासा मिळाला आहे. रायगड जिल्हा न्यायालयाने मारहाणीप्रकरणी सुनावलेल्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शिक्षेमुळे महेंद्र दळवी यांची आमदारकी धोक्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दळवी याची आमदारकी वाचली आहे.
२०१३ साली मारहाणीचा गुन्हा अलिबाग पोलीस ठाण्यात महेंद्र दळवी आणि इतरांवर दाखल झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. जिल्हा न्यायालयात मारहाण गुन्ह्याबाबत खटल्याची सुनावणी सहा महिन्यापूर्वी झाली. या गुन्ह्यात आमदार महेंद्र दळवी यांच्यावर गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. शिक्षेनंतर दळवी यांना जामीन मंजूर झाला होता. मात्र शिक्षेमुळे महेंद्र दळवी यांची आमदारकी धोक्यात आली होती.
आमदार महेंद्र दळवी यांनी शिक्षा स्थगित करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गुरुवारी २७ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत आमदार दळवी यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे दळवी यांना मोठा दिलासा मिळाला असून आमदारकी जाण्यापासून धोका टळला आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून ऍड राजानाथ ठाकूर, ऍड प्रदीप घरत यांनी काम पाहिले.