राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे मनोमिलन व्हावे यादृष्टीने अलिबाग येथे समन्वय मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र कार्यकर्त्यांचे मनोमिलन होण्यापूर्वीच आमदार मध्येच मनोमिलन झाले नसल्याचे चित्र भर मेळाव्यात व्यासपीठावर पाहायला मिळाले. कर्जत विधानसभा आमदार महेंद्र थोरवे यांना भाषण करण्यास संधी न दिल्याने त्यांनी भर सभेत नाराजी बोलून दाखवली. त्यामुळे मेळाव्याला काही प्रमाणात गालबोट लागले आहे.
रविवारी १४ जानेवारी रोजी अलिबाग येथे समुद्रकिनारी जे एस एम महाविद्यालय मैदानावर महायुतीचा समन्वय मेळावा संपन्न झाला. खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी, आमदार रवींद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर यासह माजी आमदार धैर्यशील पाटील, सुरेश लाड, तीनही पक्षाचे जिल्हाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित होते.
राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष अशी महायुतीचे सरकार आहे. आमदार, खासदार यांचे वरिष्ठ पातळीवर मनोमिलन झाले आहे. मात्र खालच्या पातळीवर आजही तीनही पक्षाच्या कार्यकर्ते यांच्यात मनोमिलन झालेले नाही आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला फटका बसला होता. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या आणि अनुषंगाने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन होणे आवश्यक आहे. हा हेतू डोळ्यासमोर ठेवून रायगड जिल्ह्यातील महायुतीचा समन्वय मेळावा अलिबाग येथे आयोजित केला होता.
मेळाव्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख तीन नेत्यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले आणि खासदार श्रीरंग बारणे यांना संधी देण्यात आली. तर भाजप तर्फे माजी आमदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवींद्र पाटील यांना संधी दिली. तर राष्ट्रावादी तर्फे खासदार सुनील तटकरे, महिला अध्यक्षा उमा मुंढे यांना बोलण्यास संधी दिली. व्यापिठवरील सर्व आमदार, खासदार यांना बोलण्याची संधी दिली असताना कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांना डावलण्यात आले. त्यामुळे भर मेळाव्यात थोरवे यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्याची समजूत काढण्याची भरत गोगावले यांनी प्रयत्न केले. मात्र त्याची नाराजी दूर झाली नाही.
तीनही पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्या मध्ये मनोमिलन होणे गरजेचे असल्याचे भाषणात म्हटले. मात्र व्यासपिठावर उपस्थित आमदार यांच्यातच मनोमिलन नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे समन्वयाची गरज ही कार्यकर्ते पेक्षा नेत्यांनाच असल्याचे बोलले जात आहे.