अलिबाग : ठाकरे गटाचे राजापूर मतदार संघाचे आमदार राजन साळवी यांच्या मालमत्ते संदर्भात गेली वर्षभरापासून रायगड लाच लुचपत विभागातर्फे सुरू आहे. वर्षभर आमदार साळवी त्याचे कुटुंब यांची वेळोवेळी चौकशी सुरू होती. बुधवार २७ डिसेंबर रोजी साळवी यांचा भाऊ, वहिनी आणि पुतण्या यांना चौकशीला हजर राहण्याची नोटीस रायगड लाच लुचपत विभागाने दिली आहे. आमदार साळवी यांच्या जमीन खरेदी आणि हॉटेलमधील भागीदारी बाबत चौकशीला बोलवण्यात आले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा आमदार राजन साळवी यांच्या मागे चौकशीचा फेरा सुरू झाला आहे.
आमदार राजन साळवी यांची गतवर्षी पाच डिसेंबर पासून मालमत्तेच्या चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे. स्वतः सह, पत्नी, मुले, भाऊ, सहाय्यक सचिव यांची रायगड लाच लुचपत विभागातर्फे चौकशी झाली आहे. आमदार साळवी यांच्या राजापूर येथील मालमत्ते बाबत लाच लुचपत विभागाने जाऊनही चौकशी केली आहे. आमदार साळवी यांनी लाच लुचपत विभागाला चौकशीला सहकार्य केले आहे. माझ्याकडे काहीही घबाड मिळणार नाही असा दावा आमदार राजन साळवी यांनी अनेकदा केला आहे.
आमदार राजन साळवी यांची जून मध्ये चौकशी झाली होती. त्यानंतर आता सहा महिन्यानंतर पुन्हा चौकशीचा फेरा सुरू झाला आहे. रायगड लाच लुचपत विभागाचे पोलिस उप अधीक्षक शशिकांत पाडावे यांनी साळवी यांचे भाऊ दीपक साळवी, वाहिनी अनुराधा दीपक साळवी, पुतण्या दुर्गेश दीपक साळवी याना बुधवारी २७ डिसेंबर रोजी जमीन खरेदी आणि हॉटेल मधील भागीदारी बाबत सर्व कागदपत्र घेऊन हजर राहण्याबाबत नोटीस दिली आहे. त्यामुळे पुन्हा आमदार साळवी यांची कुटुंबासह चौकशीसाठी अलिबागवारी सुरू झाली आहे.