राजन साळवी यांची साडे पाच तास चौकशी; लाच लुचपत कार्यालयाच्या बाहेर येताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष
By राजेश भोस्तेकर | Published: December 14, 2022 05:34 PM2022-12-14T17:34:40+5:302022-12-14T17:36:00+5:30
राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना रायगड लाच लुचपत विभागाने मालमत्तेच्या उघड चौकशीला हजर राहून जबाब नोंदविण्याबाबत २ डिसेंबर रोजी नोटीस पाठवली होती.
अलिबाग : ठाकरे गटाचे राजापूर मतदार संघाचे आमदार राजन साळवी हे स्वतः च्या आणि कुटुंबाच्या मालमत्तेच्या उघड चौकशीसाठी बुधवारी १४ डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता अलिबाग येथे रायगड लाच लुचपत कार्यालयात हजर झाले होते. साडे पाच तास चौकशी केल्यानंतर आमदार राजन साळवी हे लाच लुचपत कार्यालयाच्या बाहेर आले. यावेळी शिवसैनिकांनी एकच जल्लोष करून घोषणाबाजी केली. आमदार साळवी लाच लुचपत कार्यालयात चौकशी साठी येणार असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अधिकाऱ्याच्या प्रश्नाला योग्य उत्तरे दिली असल्याचे आमदार राजन साळवी यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना रायगड लाच लुचपत विभागाने मालमत्तेच्या उघड चौकशीला हजर राहून जबाब नोंदविण्याबाबत २ डिसेंबर रोजी नोटीस पाठवली होती. सोमवारी ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मालमत्तेची कागदपत्र घेऊन हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र आमदार राजन साळवी हे ५ डिसेंबरला चौकशीला गैरहजर राहिले होते. पंधरा दिवसांनी हजर राहणार असल्याचे आमदार राजन साळवी यांनी लाच लुचपत विभागाला कळवले होते.
सोमवारी १२ डिसेंबर रोजी आमदार साळवी हे रायगड लाच लुचपत कार्यालयात येणार होते. मात्र घरातील सदस्याचा मृत्यू झाल्याने ते हजर राहिले नव्हते. बुधवारी १४ डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आमदार साळवी कार्यालयात दाखल झाले. लाच लुचपत विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी सुषमा सोनवणे यांनी आमदार साळवी यांची चौकशी केली. आमदार राजन साळवी यांची साडे पाच तास चौकशी करण्यात आली. यामध्ये त्याच्या स्वतः च्या, पत्नी, दोन मुले, भाऊ आणि त्याच्या कुटुंबाच्या मालमत्तेबाबत माहिती अधिकाऱ्यांनी घेतली असल्याचे आमदार राजन साळवी यांनी मध्यामशी बोलताना माहिती दिली.
कार्यालयाबाहेर शिवसैनिकांची गर्दी
आमदार राजन साळवी हे लाच लुचपत कार्यालयात चौकशीला येणार असल्याने सकाळ पासून रायगडातील शिवसैनिक, पदाधिकारी यांनी कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. साळवी याचे आगमन होताच शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. तर चौकशीनंतरही शिवसैनिकांनी साळवी यांना उचलून घोषणाबाजी केली. यावेळी आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी तसेच रायगडच्या शिवसैनिकांचे आभार मानले.
कार्यालयाला पोलिसांचा गराडा-
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी हे चौकशीला येणार असल्याने कायदा सुव्यवस्था बिघडवू नये यासाठी रायगड लाच लुचपत कार्यालयाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अलिबाग पोलीस तसेच एक पलटून असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यालयात शिवसैनिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.
माझ्या सारख्या सर्व सामान्य शिवसैनिकाला नोटीस पाठवून मोठे घबाड असल्याचे सरकारला वाटत आहे. मात्र त्याचा भ्रमनिरास होइल. सरकारच्या माध्यमातून मला मालमत्ते बाबत नोटीस देण्यात आलेली होती. त्यानुसार मी हजर राहून चौकशीला सामोरे गेलो आहे. अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली असून २० जानेवारी पर्यंत मालमत्तेची सविस्तर माहिती दिलेल्या फार्म मध्ये भरून देणार आहे.
-आमदार राजन साळवी