- मधुकर ठाकूर
उरण : उरण -नेरुळ रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील खारकोपर ते उरण रेल्वे मार्ग पाच वर्षांनी प्रवासी वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार आहे. १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या लोकार्पणाचा सोहळा पार पडणार आहे.या सोहळ्याची जाहिरात करताना मात्र भाजपचे महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच रेल्वे प्रकल्प प्रवाशांसाठी सुरू होत आहे.या जाहिरातीत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांचा कुठेही साधा उल्लेखही नसल्याने मात्र शिंदे गटातुन नाराजी व्यक्त केली जात आहे.
सिडको,मध्यरेल्वे यांच्या भागीदारीत २७ किमी लांबीचा आणि १७८२ कोटी खर्चाच्या नेरूळ -उरण महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यापैकी या पहिल्या टप्प्यातील २७ किमी लांबीच्या या रेल्वे मार्गावरील ११ स्थानकांपैकी नेरुळ,सीवूड,सागर संगम, बेलापूर, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर अशा १२.५ किमी अंतरापर्यंत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर उर्वरित गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी,उरण या स्टेशन दरम्यान १४.३ किमी लांबीच्या रेल्वे मार्गावरील दुसऱ्या टप्प्यातील रखडलेल्या कामातील विविध अडथळे दूर करण्यात आल्यानंतर रेल्वे मार्ग आता प्रवासी वाहतूकीसाठी तयार झाला आहे. याच रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारी रोजी लोकार्पण होणार असल्याच्या जाहिरातीचे फ्लॅक्स सार्वजनिक ठिकाणी लागले आहेत.भाजपचे महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच रेल्वे प्रकल्प प्रवाशांसाठी सुरू होत असल्याचे या जाहिरातीमध्ये म्हटले आहे.या जाहिरातीमध्ये शिंदे गटाचे आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे प्रकल्प सुरू करण्यासाठी केलेल्या कामाचा साधा उल्लेखही केला नाही.
पाठपुरावा, पत्रव्यवहार कुणी केला याची माहिती तर साऱ्यांनाच आहे.कुणी काय जाहिरात करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याची सावध प्रतिक्रिया श्रीरंग बारणे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे. भाजपच्या कुटनितीबाबत मात्र शिंदे गटाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष अतुल भगत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.दिल्लीतील रेल्वे भवन, रेल्वे मंत्री यांच्याशी अनेकदा पत्रव्यवहार करून उरण- नेरुळ लवकरात लवकर प्रवासी वाहतूक सुरू करण्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. असे असतानाही जाहिरातीमध्ये खासदारांचा साधा उल्लेखही केला नसल्याने अतुल भगत यांनी खेदही व्यक्त केला आहे.