माथेरान : ब्रिटिशांनी वसविलेले पर्यटनस्थळमाथेरान. विकास कामांसाठी अनेक निर्बंध लागू असल्याने, गेली अनेक वर्षे येथील स्थानिकांना विकास कामांसाठी संघर्षच करावा लागला आहे. मागील काही वर्षांमध्ये येथे एमएमआरडीएने भरीव निधी उपलब्ध करून दिल्यानंतर, येथे सर्वच थरांमध्ये पर्यटनक्रांती सुरू झाली असून, त्यानुसार माथेरानमधील विविध ठिकाणी रस्त्यांची, तसेच प्रेक्षणीय स्थळांच्या सुशोभीकरणाची कामे जोमाने सुरू असल्याने आगामी काळात माथेरानचे पर्यटन प्रगतिपथावर असणार आहे.
माथेरान हे पर्यटनदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखले जाते. येथे पर्यावरणवाद्यांची नेहमीच करडी नजर राहिलेली आहे. त्यामुळे १७० वर्षे उलटून गेल्यानंतरही हे पर्यटनस्थळ काहीसे उपेक्षितच राहिलेले आहे. येथे आजही ब्रिटिशकालीन कायदे अस्तित्वात आहेत, तर पर्यावरण सनियंत्रण समिती व हरित लवादाची विशेष नजर असल्याने अत्याधुनिकीकरणाच्या काळात येथे आजही पारंपरिक व्यवसायच सुरू आहे. येथे वाहन म्हणून घोडे, हातरिक्षाचा वापर केला जातो येथील रस्ते दगडमातीचे आहेत. त्यामुळे माथेरानकरांना धूळविरहित रस्त्यांसाठी अनेक वर्षे संघर्ष करावा लागला आहे. इतर पर्यटनस्थळांच्या तुलनेत येथे पर्यटन विकास झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील एकमेव हिल रेल्वे व प्रदूषणविरहित वातावरण असलेले हे पर्यटनस्थळ आजही उपेक्षितच राहिलेले आहे. येथील रस्ते हा येथील पर्यटकांसाठी नेहमीच त्रासाचा मुद्दा ठरलेला आहे. मागील काही वर्षांमध्ये एमएमआरडीएने माथेरानमधील प्रेक्षणीय स्थळे व मुख्य रस्त्यांसाठी भरीवनिधी उपलब्ध करून दिल्याने येथे विकासाची गंगा येणार आहे. त्यानुसार, कामे सुरूही झाली आहेत. पॅनोरमा पॉइंट गेली कित्येक वर्षे पर्यटकांसाठी बंद झाला होता, पण येथे एमएमआरडीएच्या मार्फत सुरू असलेल्या कामांमुळे येथील पॉइंटचे रूप पालटणार आहे.
माथेरानकरांना अनेक वर्षे भेडसावणारा वाहनस्थळाचा प्रश्नही मार्गी लागण्याच्या बेतावर आहे. पर्यटन हंगामामध्ये सलग सुट्ट्या लागून आल्यानंतर माथेरानमध्ये वाहनस्थळासाठी जागा अपुरी पडत असे, पण येथेही एमएमआरडीएच्या माध्यमातून सुसज्ज असे वाहनस्थळ उभारण्यात येत असून, पूर्वीच्या मानाने आता येथे तीनपट अधिक वाहने उभी राहू शकतील, असे वाहनस्थळाच्या निर्मितीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, हे काम करताना आजूबाजूच्या निसर्गाचा विचार करून येथे असलेल्या झाडांनाही संरक्षण भिंती उभारण्यात आल्या आहेत.
२००३ साली तत्कालीन नगराध्यक्ष अजय सावंत यांनी १२३ कोटी निधी माथेरानच्या विकासासाठी मंजूर करून आणला होता, पण तो २००७ साली नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे वर्ग झाला व या कामांना सुरुवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे माथेरानवर विशेष लक्ष आहे. आगामी काळात माथेरानसाठी ३७.५ कोटी निधी उपलब्ध होणार आहे. त्यातील पाच कोटी रुपये येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडासंकुल सुशोभीकरणासाठी, साडेसात कोटी येथील रस्ते बांधकाम व पंचवीस कोटी विविध कामांसाठी मंजूर झाला आहे.