टोलनाक्यावर प्रचंड कोंडी, रुग्णवाहिकाही अडकली; राज यांचा ठाकरी 'दणका', सर्व वाहने सोडली!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 08:57 PM2024-01-07T20:57:36+5:302024-01-07T21:03:26+5:30

राज ठाकरे हे स्वत: गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना फटकारत वाहतूक कोंडीत अडकलेल्या सगळ्या गाड्या सोडल्या.

mns chief raj thackeray stuck in Heavy traffic jam at the khalapur toll plaza | टोलनाक्यावर प्रचंड कोंडी, रुग्णवाहिकाही अडकली; राज यांचा ठाकरी 'दणका', सर्व वाहने सोडली!

टोलनाक्यावर प्रचंड कोंडी, रुग्णवाहिकाही अडकली; राज यांचा ठाकरी 'दणका', सर्व वाहने सोडली!

MNS Raj Thackeray ( Marathi News ) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून टोलच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत असतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत टोलनाक्यांवर होणारी अतिरिक्त वसुली आणि नियमांची मोडतोड, याबाबत कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र अजूनही टोलनाक्यांवर नियमांची पायमल्ली होत असून आज याचा अनुभव स्वत: राज ठाकरे यांनाच खालापूर येथील टोलनाक्यावर आला. या प्रकारामुळे संतापलेल्या राज ठाकरे यांनी टोलनाक्यावरील अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.

पिंपरीमधील कार्यक्रम आटोपून मुंबईकडे येत असलेले राज ठाकरे खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगाच रागा लागल्या असल्याने अडकले. तसंच या वाहतूक कोंडीत एक रुग्णवाहिकाही अडकली होती. टोलनाक्यावर वाहनांची रांग यलो लाइनच्या बाहेर गेल्यानंतर वाहने टोल न घेता सोडली जावीत, असा नियम आहे. मात्र आज खालापूर टोलनाक्यावर वाहनांची भलीमोठी रांग लागल्यानंतरही टोलवसुली सुरूच होती. त्यामुळे राज ठाकरे हे स्वत: गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी सगळ्या गाड्या सोडल्या. तसंच यावेळी राज यांनी आपल्या खास ठाकरी शैलीत अधिकाऱ्यांना दमही दिला.

"यापुढे मला असला प्रकार दिसला तर याद राखा," असं राज ठाकरे यांनी टोलनाक्यावरील अधिकाऱ्याला बजावलं. राज यांनीच पुढाकार घेऊन टोलनाक्यावरील वाहने सोडल्याने वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला.

दरम्यान, थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत आणि प्रत्यक्ष भेट घेऊनही टोलनाक्यांवर नियम पाळले जात नसल्याने आगामी काळात राज ठाकरे हे पुन्हा एकदा टोलविरोधात आक्रमक आंदोलन उभे करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 

Web Title: mns chief raj thackeray stuck in Heavy traffic jam at the khalapur toll plaza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.