कडाव ग्रामपंचायतीवर मनसे

By admin | Published: November 4, 2015 11:07 PM2015-11-04T23:07:52+5:302015-11-04T23:07:52+5:30

कर्जत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी बुधवारी निवडणूक झाली. त्यात कडावमध्ये मनसे-आरपीआयच्या गीता गायकवाड या तर भिवपुरीमध्ये शिवसेनेच्या

MNS on Kadava Gram Panchayat | कडाव ग्रामपंचायतीवर मनसे

कडाव ग्रामपंचायतीवर मनसे

Next

नेरळ : कर्जत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी बुधवारी निवडणूक झाली. त्यात कडावमध्ये मनसे-आरपीआयच्या गीता गायकवाड या तर भिवपुरीमध्ये शिवसेनेच्या अनिता बोडके आणि वैजनाथमध्ये सेना-भाजपा युतीच्या नयना गुरव यांची सरपंचपदी निवड झाली आहे.
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या कडाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी पीठासीन अधिकारी पी. पी. नवाले यांच्याकडे अनुसूचित जाती महिला राखीव गटातून निवडून आलेल्या गीता उमेश गायकवाड यांचा तर उपसरपंच पदासाठी काशिनाथ भालू मराडे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे तेथे सरपंच म्हणून गायकवाड यांची तर उपसरपंच म्हणून मराडे यांची बिनविरोध निवड झाली. त्यावेळी विशेष सभेला सदस्य किशोर भुन्डेरे, गुलाब बैलमारे, निलेश भोईर, आदी उपस्थित होते. मनसेचे तालुका अध्यक्ष सुदाम पवाळी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक १०० टक्के यश मिळवून जिंकली आहे.
भिवपुरी ग्रामपंचायतीमध्ये सर्वसाधारण असलेल्या सरपंचपदासाठी पीठासीन अधिकारी एम. आर. पाटील यांच्याकडे शिवसेनेच्या अनिता बोडके यांनी तर उपसरपंच पदासाठी रमेश पवार यांनी अर्ज दाखल केला होता. निर्धारित वेळेत त्यांचे एकमेव अर्ज आल्याने सरपंचपदी अनिता बोडके तर उपसरपंच म्हणून रमेश पवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. विशेष सभेला स्वप्नील भोसले, आशा ढाकवळ आदी सदस्य उपस्थित होते. ही निवडणूक शिवसेनेने माजी सरपंच अण्णा बोडके यांच्या नेतृत्वाखाली लढली होती.
वैजनाथ ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव सरपंचपदासाठी पीठासीन अधिकारी किरण पाटील यांच्याकडे सरपंचपदासाठी शिवसेना-भाजपा युतीच्या नयना गुरव आणि राष्ट्रवादीच्या सुरेश गुरव यांनी तर उपसरपंचपदासाठी शिवसेना-भाजपा युतीच्या सुनीता खंडू गुरव आणि राष्ट्रवादीचे माधव कांगणे यांनी अर्ज दाखल केले होते. निर्धारित वेळेत कोणीही अर्ज मागे घेतले नाहीत त्यामुळे सरपंच आणि उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच-उपसरपंच पदासाठी नयना गुरव, सुनीता गुरव यांना पाच तर सुरेश गुरव, माधव कांगणे यांना प्रत्येकी चार मते मिळाली. त्यामुळे सरपंचपदी नयना गुरव, उपसरपंच म्हणून सुनीता गुरव विजयी झाल्याचे जाहीर केले.

सरपंचपदाच्या निवडणुकीत सेनेची सरशी
उरण : तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीतील सरपंच पदाच्या निवडणुका पार पडल्या असून शिवसेनेने सर्वाधिक चाणजे, नागाव व केगाव या तीन ग्रामपंचायतींवर सत्ता स्थापित केली आहे. चाणजेच्या सरपंचपदी हिना कोळी तर उपसरपंचपदी प्रदीप कोळी, केगावच्या सरपंचपदी दीपेश कोळी तर उपसरपंचपदी राजेंद्र ठाकूर, नागावच्या सरपंचपदी नम्रता वारीक तर उपसरपंचपदी मोहन काठे हे निवडून आले. वेश्वी सरपंचपदी शिवसेना विरहित ग्राम विकास आघाडीच्या सुजाता मुंबईकर तर उपसरपंचपदी नरेंद्र मुंबईकर.
फुंडे ग्रा.पं.वर शेकापने वर्चस्व प्रस्थापित केले असून सरपंच पदी ज्योती म्हात्रे, उपसरपंचपदी अमर म्हात्रे हे निवडून आले आहेत.
म्हातवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाचे राकेश म्हात्रे तर उपसरपंचपदी भूषण पाटील हे निवडून आले.

पळस सरपंचपदी सीता वाघमारे
नागोठणे : रोहे तहसील कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद देवकर यांचे मार्गदर्शनाखाली ग्रामविकास अधिकारी राकेश टेमघरे यांच्या सहकार्यातून बुधवारी पळस ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच आणि उपसरपंचपदाची निवडणूक होवून सरपंचपदी अनुसूचित जमाती वर्गातून निवडून आलेल्या सीता वाघमारे आणि उपसरपंचपदी वाघळी-कोयनावाडी येथील तुकाराम कदम यांची निवड करण्यात आली. यावेळी रोहे पंचायत समितीचे माजी सभापती तथा राष्ट्रवादीचे नेते शिवराम शिंदे, सखुबाई पिंगळा,बेबी नाईक आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

दिघी सरपंचपदी सुमती चिकाटी बिनविरोध
बोर्लीपंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी ग्रुपग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नागरी आघाडीच्या सुमती चिकाटी यांची बिनविरोध निवड झाली. सुमती चिकाटी या याआधी त्याच ग्रामपंचायतीमध्ये डाटा आॅपरेटर म्हणून सेवेत होत्या, तर उपसरपंचपदी नागरी आघाडीचेच महादेव बेंडूक बिनविरोध निवडून आले. दिघी ग्रामपंचायतीची निवडणूक पूर्णत: बिनविरोध झाली. दिघी, नानवेली, करळास गावातील ग्रामस्थांच्या नागरी आघाडीचे १० सदस्य बिनविरोध सदस्य म्हणून देण्यात आले. बुधवारी अधिकारी एस.जी.वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक झाली.

Web Title: MNS on Kadava Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.