राष्ट्रीय महामार्गावर मनसेचे आंदोलन !
By admin | Published: August 7, 2016 02:59 AM2016-08-07T02:59:47+5:302016-08-07T02:59:47+5:30
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे पाहता रस्ता आहे की खड्डा अशी दयनीय अवस्था या राष्ट्रीय महामार्गाची झालेली आहे. पेण खारपाडा ब्रीजपासून
पेण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे पाहता रस्ता आहे की खड्डा अशी दयनीय अवस्था या राष्ट्रीय महामार्गाची झालेली आहे. पेण खारपाडा ब्रीजपासून वडखळपर्यंतच्या १७ किलो मीटर अंतरात खड्ड्यांचे जाळेच पसरले आहे. खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून, अनेकांनी या महामार्गावर जीव गमावला आहे.
गणेशोत्सोवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करण्यासारखेच आहे. महाड येथील सावित्री नदीवरचा पडलेला पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील खड्डे २४ तासांच्या आत भरले नाहीत, तर मनसे स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा मनसे जिल्हाप्रमुख जितेंद्र पाटील यांनी पेण रेल्वे स्थानकाजवळील महामार्गावर रस्ता रोको आंदोलनाप्रसंगी सरकारला दिला.
रायगड जिल्हा मनसेतर्फे पेण रेल्वेस्थानकासमोर महामार्ग अडविला होता. याप्रसंगी मनसेच्या आंदोलनाची तातडीने दखल घेत प्रांत अधिकारी प्रेमलता जैतू व पेणच्या तहसीलदार वंदना मकू तातडीने आंदोलकांना भेटून महामार्गाचे काम करणारे ठेकेदार कंपनी, राष्ट्रीय महामार्ग एनएचआयचे संबंधित अधिकारी वर्ग, वाहतूक पोलीस यंत्रणा व पेण पोलीस निरीक्षकासोबत सायंकाळी तातडीची बैठक आयोजित करून आंदोलकाना शासनातर्फे आश्वासन देण्यात आले आहे. जिल्हा मनसे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी महामार्गाचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.