म्हसळा शिवसेना रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 02:23 AM2018-08-16T02:23:21+5:302018-08-16T02:23:35+5:30
म्हसळा तालुक्यासह श्रीवर्धन, दिघी, माणगाव या मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे.
म्हसळा - म्हसळा तालुक्यासह श्रीवर्धन, दिघी, माणगाव या मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. अनेक महिने झाले तरीही हे खड्डे भरण्याचे काम संबंधित विभागाकडून करण्यात आलेले नाही, त्यामुळे प्रशासनाला जनतेला होणाऱ्या त्रासाचे काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. याबाबत संबंधित खात्याचे मंत्री व प्रशासनातील अधिकारी यांना अनेक वेळा लेखी निवेदने देऊन रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली होती.
दिघी माणगाव रस्त्याची अवस्था बिकट असतानाही दिघी पोर्टची ओव्हर लोड अवजड वाहतूक चालू आहे. या मार्गावर बºयाच वेळा चालक मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत बेशिस्तपणे गाडी चालवत असल्याचे पाहायला मिळतात, त्यामुळे या संपूर्ण परिसरातील जनतेत भयाचे सावट निर्माण झाले आहे. अनेक वेळा यांची प्रशासनाकडे तक्रार करूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. याबाबत सर्व तक्र ारी प्रशासनाकडे वारंवार करूनसुद्धा कोणतीही ठोस कारवाई प्रशासन करीत नाही. त्यामुळे यातून हेच सिद्ध होते की प्रशासन मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची वाट पाहत आहे, त्याचबरोबर प्रशासन नक्की कोणाचे आहे दिघी पोर्टचे की जनतेचे, हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे, तसेच वारंवार प्रशासनाकडे तक्रार करूनदेखील प्रशासन दिघी पोर्टच्या मुजोर ट्रेलरचालकांवर कारवाई का करीत नाही, यामुळे दिघी-माणगाव रस्त्यावर प्रवास करणारे व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्याचबरोबर सर्व नियम धाब्यावर बसवून व पायदळी तुडवून भरदिवसाही ओव्हर लोड अवजड वाहतूक चालूच असते याचा तालुक्यातील नागरिकांनाच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या मुजोर ट्रेलरचालकांवर कोणतीही कारवाई न केल्यामुळे आणि प्रशासन नक्की कोणाचे आहे दिघी पोर्टचे की जनतेचे, हादेखील प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या जबाबदारी खातर प्रशासनाविरोधात म्हसळा तालुक्यातील शिवसेना, अवजड वाहतूक सेना, युवासेना यांच्या वतीने १५ आॅगस्ट रोजी तीव्र आंदोलन करण्यात आले. या वेळी सदर आंदोलनास माजी श्रीवर्धन मतदारसंघाचे आमदार तुकाराम सुर्वे, जिल्हाध्यक्ष रवि मुंडे, म्हसळा तालुका शिवसेना प्रमुख नंदू शिर्के तसेच युवा सेना पदाधिकारी यांच्यासहित तालुक्यातील इतर शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच केंद्रात व राज्यात शिवसेना जरी सत्तेत असली तरी जनतेच्या प्रश्नांची जाणीव ठेवून जनतेसाठी आंदोलन करणार असून, वेळप्रसंगी स्वत:वर गुन्हे दाखल करून घेण्याची ही तयारी आहे, असे रवि मुंडे यांनी सांगितले.
या वेळी तालुकाप्रमुख नंदू शिर्के यांसह श्रीवर्धन विधानसभा क्षेत्र संघटक रवींद्र लाड, उपतालुकाप्रमुख अनंत कांबळे, वाहतूक सेनाअध्यक्ष श्याम कांबळे, युवासेना अधिकारी अमित महामुनकर, नितीन पेरवी, अमोल पेंढारी, सचिन महामुनकर, संतोष सुर्वे उपस्थित होते.