आंदोलनाच्या सहाव्या दिवशी मनसेचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 02:52 AM2020-12-03T02:52:23+5:302020-12-03T02:52:30+5:30
सरकारी अधिकाऱ्यांनी या आंदोलनाकडे अद्याप डोळेझाकच केली असल्याने तलाठ्यांपासून अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सहाव्या दिवसांपर्यंत कोणीही आंदोलनस्थळी फिरकलेच नाही.
नागोठणे : लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने चालू असलेल्या आंदोलनाच्या सहाव्या दिवशी बुधवारी मनसेचे जिल्हा संघटक गोवर्धन पोलसांनी यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देत राज ठाकरे यांच्या आदेशानुसार या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
सरकारी अधिकाऱ्यांनी या आंदोलनाकडे अद्याप डोळेझाकच केली असल्याने तलाठ्यांपासून अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सहाव्या दिवसांपर्यंत कोणीही आंदोलनस्थळी फिरकलेच नाही. रिलायन्सच्या सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या आंदोलनाकडे दुर्लक्षच केले असले, तरी कंपनीत असणारे ठेकेदारीतील कामगारही आंदोलनात सहभागी झाले आहेत. सहाव्या दिवशी या आंदोलनाची दखल मनसेने घेतली आहे, तर कंपनीत कामावर जाणाऱ्या कामगारांची संख्या प्रचंड कमी झाल्याचे बोलले जात आहे. आंदोलनात सहभागी झालेले शेकडो प्रकल्पग्रस्त आणि दुसऱ्या बाजूला उभे असणारे प्रचंड असे पोलीसबळ असेच चित्र दररोज दिसून येत असून, रिलायन्सचे अधिकारीही कोणाशी अधिकृतपणे बोलत नसल्याने रिलायन्सची बाजू उघडच होत नाही. मात्र, आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय येथून उठणारच नसल्याचा ठामपणा प्रकल्पग्रस्तांकडून आज सहाव्या दिवशीही खंबीरपणे व्यक्त होतो आहे.