मुंबईतील लोकसभेच्या सर्व जागा मनसे लढविणार- बाळा नांदगावकर; सहकार शिबिराचा समारोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 01:25 PM2024-01-09T13:25:56+5:302024-01-09T13:27:15+5:30
नांदगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेलाही दिले उत्तर
लोकमत न्यूज नेटवर्क, कर्जत: सध्या जे पळवापळवीचे राजकारण सुरू आहे, त्याला जनता कंटाळली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच एकमेव पर्याय असल्याचा विश्वास देत आता मनसे लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सर्व जागा लढविणार असल्याचे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी येथे सहकार शिबिराच्या समारोपात सांगितले. मनसेच्या दोनदिवसीय सहकार शिबिराचा समारोप नांदगावकर, सरचिटणीस रिटा गुप्ता, ज्येष्ठ नेते अनिल शिदोरे, सहकार सेलचे अध्यक्ष दिलीप धोत्रे, रेल्वे युनिट अध्यक्ष जितेंद्र पाटील, किसान सेलचे अध्यक्ष संतोष नागरगोजे, सहकार सेलचे पदाधिकारी सरचिटणीस विजय जाधव, अनिता माझगावकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र काळे, महिला उपाध्यक्ष प्रियांका शृंगारे यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी नांदगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना, तुम्ही सहकारी संस्था काढल्या आणि घोटाळे केले. शेवटी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीपुढे डोक्याला हात लावून बसावे लागले, ही तुमची स्थिती असल्याचे सांगितले. सहकार म्हणजे सत्तेकडे जाण्याचे गणित आहे, हे सांगत तोडा फोडा आणि राज्य करा हे धोरण अंगीकारून सहकार क्षेत्रात प्रवेश करीत महाराष्ट्र काबीज करायचा आहे, असे आवाहन अनिल शिदोरे यांनी पदाधिकाऱ्यांना केले. याप्रसंगी मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष जे. पी. पाटील, कर्जत अध्यक्ष महेंद्र निगुडकर, आदी उपस्थित होते.