लोकमत न्यूज नेटवर्क, कर्जत/ नेरळ: आताचे सरकार म्हणजे सहकार चळवळ नाही तर ती सहारा चळवळ आहे. सध्या सगळे एकमेकांना सहारा देत सरकार पुढे ढकलत आहेत, अशी टीका करीत आपली महानंदा अमुल गिळंकृत करते की काय, अशी खंत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे व्यक्त केली. कर्जत तालुक्यातील नेरळ धामोते येथील एका रिसॉर्टवर मनसेच्या सहकार सेनेचे दोन दिवसीय मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर मनसेच्या सरचिटणीस तथा मनसे चित्रपट सेना कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे, सरचिटणीस रिटा गुप्ता, ज्येष्ठ नेते नितीन सरदेसाई, सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप धोत्रे, कामगार सेनेचे शिरीष सावंत, राजा चौगुले, मनसे सरचिटणीस तथा शेतकरी सेना अध्यक्ष संतोष नागरगोजे, अनुसया माजगावकर रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रविरोधी सहकार चळवळ थांबायला हवी
राज ठाकरे यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा दाखला देत नवी मुंबई विमानतळ आणि न्हावा शेवा शिवडी सागरी सेतू असे प्रकल्प उभे राहत आहेत. मात्र यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीच गेल्या. पण प्रकल्पाच्या आजूबाजूच्या जमिनी कोणी विकत घेतल्या हे देखील पहावे लागेल, असे सांगत ही महाराष्ट्र विरोधी सहकार चळवळ थांबायला हवी. नाही तर मनसेचे कार्यकर्ते ती मोडीत काढतील, असा इशाराही दिला.
मनसे स्वाभिमान गहाण टाकणार नाही
मराठी उद्योजकांना मदतीचा हात द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यमान सरकारवर टीका केली. आपल्याकडचे नेते मिंधे झाले आहेत. तेव्हा ते तुमची बाजू उचलून धरतील, या आशेवर बसू नका. ते फक्त इकडून तिकडे उड्या मारतात. या मिंध्या नेत्यांनी त्यांची मने, स्वाभिमान गहाण टाकला आहे. मात्र मनसे स्वाभिमान गहाण टाकणार नाही, असे यावेळी त्यांनी आश्वासित केले.