मोबाइल नेटवर्कचा उडाला बोजवारा, बोर्लीपंचतनमध्ये ऑनलाइन शिक्षणाला खोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 12:44 AM2020-10-30T00:44:12+5:302020-10-30T00:45:06+5:30

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन, दिवेआगर, भरडखोल, वडवली, शिस्ते या भागामध्ये खासगी कंपन्यांकडून देण्यात येत असलेल्या मोबाइल नेटवर्क सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे.

Mobile Network's Problem Borlipanchatan | मोबाइल नेटवर्कचा उडाला बोजवारा, बोर्लीपंचतनमध्ये ऑनलाइन शिक्षणाला खोडा

मोबाइल नेटवर्कचा उडाला बोजवारा, बोर्लीपंचतनमध्ये ऑनलाइन शिक्षणाला खोडा

Next

- अभय पाटील 
बोर्लीपंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन, दिवेआगर, भरडखोल, वडवली, शिस्ते या भागामध्ये खासगी कंपन्यांकडून देण्यात येत असलेल्या मोबाइल नेटवर्क सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. मागील वर्षभरामध्ये या कंपन्यांची सेवा सुधारत नसल्याने व कंपनीला ग्राहकांच्या तक्रारींकडे बघण्यासाठी वेळच नसल्याने शिवसेना आता अधिक आक्रमक झाली असून, मोबाइल टॉवर असणाऱ्या ठिकाणी धडक दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सेवा पुढील दिवसात निश्चित सुरळीत होईल, असे आश्वासन दिल्याने शिवसैनिक शांत झाले व १० नोव्हेंबरपर्यंत सर्व मोबाइल कंपन्यांची सेवा चांगल्या प्रकारे सुरू झाली नाही, तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा उपतालुकाप्रमुख सुकुमार तोंडलेकर यांनी अधिकाऱ्यांना दिला. 

तालुक्यातील मोठी बाजारपेठ व प्रमुख शासकीय कार्यलय असलेल्या बोर्लीपंचतनसह पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर, मच्छीमारी व्यावसायिक केंद्र असलेल्या भरडखोल त्याचप्रमाणे मोठ्या लोकसंख्येची गावे शिस्ते, वडवली यांसह इतरही अनेक छोट्या-मोठ्या खेडेगावांना व्होडाफोन, आयडिया, बीएसएनएल, जिओ या कंपन्या मोबाइल नेटवर्क सेवा देत आहेत. त्यामध्ये सर्व कंपन्यांना चांगला ग्राहक वर्गदेखील आहे; परंतु मागील वर्षभर या सर्व कंपन्यांचे मिळत असलेले नेटवर्क सुमार दर्जाचे असून अनेक वेळा प्रयत्न करूनही कॉल न लागणे, वारंवार खंडित होणारे नेटवर्क, इंटरनेट सेवादेखील व्यवस्थित नसल्याने कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणामध्येदेखील खोडा बसत असल्याने पालक व विद्यार्थ्यांचीदेखील मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
ग्राहकांनी अनेकवेळा कंपन्यांच्या ग्राहक सेवेकडे तक्रार नोंदवूनदेखील कंपनी याकडे दुर्लक्ष करीत आली आहे.

या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांतून कोणताही उद्रेक होऊ नये म्हणून तालुक्यातील शासकीय अधिकारी वर्गाकडून याबाबत मोबाइल कंपनीला सेवा सुरळीत करण्याबाबत सूचना दिल्या होत्या तर लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील याबाबत मोबाइल कंपनीच्या संबंधित अधिकारी वर्गाकडे तक्रारी देऊनही यामध्ये अजिबात बदल होत नसल्याचे पाहून अखेरीस गुरुवारी अधिकारी वर्गाचे लक्ष वेधण्यासाठी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी उपतालुका प्रमुख सुकुमार तोंडलेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व्होडाफोन कंपनीचे टॉवर असलेल्या ठिकाणी धडक दिली; परंतु तिथे कोणीही कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित नसल्याने सुकुमार तोंडलेकर यांनी मोबाइलवरून कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे बोलले. यावर १० नोव्हेंबरपर्यंत तांत्रिक असलेले बिघाड दूर करण्याचे अधिकारी वर्गाने सांगितले. यावर उपतालुकाप्रमुख यांनी त्यांना १० नोव्हेंबरपर्यंत जर मोबाइल सेवेसह इंटरनेट सेवा सुरळीत झाली नाही, तर शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला. या वेळी बोर्ली पंचतन शाखाप्रमुख नंदकिशोर भाटकर, युवासेना तालुकाधिकारी संदेश म्हसकर, सचिव कुणाल पेडणेकर, विभाग प्रमुख रमेश कांबळे, बोर्लीपंचतन सरपंच नम्रता गाणेकर, सदस्य संतोष कांबळे, भूमी कांबळे, नुझहत जहांगीरदार, शिवसैनिक कुमार गाणेकर, शंकर गाणेकर, सुजित शिसतकर, प्रवीण मयेकर, रफिक जहांगीरदार, विजय तन्ना तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते. या वेळी उशिराने व्होडाफोन कंपनीचे विभागाचे डिस्ट्रीब्युटर महंमदअली मर्चंट आले. त्यांच्याकडे येथील व्यथा मांडण्यात आल्या. 

सध्या कोविडच्या प्रचंड साथीमुळे शाळा भरत नाहीत त्यावर ऑनलाइन शिक्षण देण्याचे शासनाचे पत्रक आहे. परंतु बोर्लीपंचतन परिसरामध्ये मोबाइल इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांचे नेटवर्क एवढे खराब आहे की त्यामुळे कोणत्याही प्रकारे ऑनलाइन अभ्यास होत नसल्याने पालक वर्गाने काय करावे, हाच मोठा प्रश्न आहे. 
- विपिन महाडिक, 
नागरिक, बोर्लीपंचतन 

कंपनीची सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे. आम्हाला १० दिवसांचा कालावधी द्या. आम्ही निश्चित सेवा सुधारू.
- धीरज सोळंकी, 
विभागीय नेटवर्क मॅनेजर 

Web Title: Mobile Network's Problem Borlipanchatan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.