आंग्रेकालीन सीमोल्लंघन परंपरेस रघुजी राजे आंग्रे यांनी दिला आधुनिक स्नेहाचा आयाम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 09:00 PM2018-10-18T21:00:55+5:302018-10-18T21:01:02+5:30
सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या काळातील सीमोल्लंघन आणि सोने लुटण्याची पंरपरा आंग्रे यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी येथील हिराकोट किल्ल्या शेजारील घेरिया या आपल्या निवासस्थानी आजही अबाधित राखली आहे.
- जयंत धुळप
अलिबाग : सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या काळातील सीमोल्लंघन आणि सोने लुटण्याची पंरपरा आंग्रे यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी येथील हिराकोट किल्ल्या शेजारील घेरिया या आपल्या निवासस्थानी आजही अबाधित राखली आहे. दरवर्षी या कार्यक्रमाकरिता मराठा बांधव सहकुटुंब विजया दशमीच्या संध्याकाळी घेरियामध्ये एकत्र येतात. गुरुवारी विजया दशमीच्या दिवशी संध्याकाळी रघुजीराजे आंग्रे व मराठा बांधवांतील ज्येष्ठांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधव सीमोल्लंघनास निघाले होते. हिराकोट किल्ल्या शेजारून हिराकोट तलावावरून तलावाशेजारील आंग्रेकालीन राज राजेश्वरी देवीच्या मंदिरात देवीस अभिवादन करून आशीर्वाद घेतले. सर्वांना सुखसमृद्धी लाभण्याकरिता देवीस रघुजीराजे आंग्रे यांनी सर्व मराठा बांधवांच्या वतीने गार्हाणे घालून आशीर्वाद मागितला. यावेळी आपटय़ाच्या पानांची विधिवत पूजा करून आई भवानीच्या आरतीनंतर मंदिरात सोने लुटण्यात आले.
घेरियात सुवर्ण पुजनांती, सोने लुटून शुभेच्छा
घेरियामध्ये परतल्यावर भगव्या ध्वजाच्या साक्षीने आपट्यांच्या पानांचे सोन लुटण्याकरिता सज्ज ठेवण्यात आले होते. त्याचेही रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून, सर्वांनी सोने लुटण्याचा आनंद घेतला. लुटलेले सोने एकमेकाला देत आलिंगनासह सर्वांनी एकमेकाला शुभेच्छा दिल्या. मराठा भगिनींनी देखील एकमेकींना सोने देऊन अभिवादन केले.
संघटित राहण्यासाठी सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी सुरू केली परंपरा
सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या काळात परिसरातील सर्वानी संघटित राहावे त्याकरिता एकत्र यावे या हेतूने सीमोल्लंघन व सोने लुटण्याची परंपरा सुरू झाली. आजच्या व्हॉट्सअॅप, ट्विटरच्या जमान्यात प्रत्यक्ष भेटून शुभेच्छांची देवाणघेवाण कमी होत चालली आहे. आधुनिकता स्वीकारताना आपल्या प्राचीन परंपरा आणि त्यानिमित्ताने संघटित होणे ही देखील काळाची गरज असल्याने, सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांची सीमोलंघनाची परंपरा अबाधित राखून त्यास आधुनिक स्नेहाचा आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे. दिवसेंदिवस हा उपक्रम यशस्वी होते आहे, याचा आनंद वाटत असल्याची भावना या निमित्ताने रघुजीराजे आंग्रे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.