आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्हा हागणदारीमुक्त झाल्यानंतर आता रायगड जिल्हा परिषदेने ‘व्हिजन २०२२’ डोळ््यासमोर ठेवले आहे. नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५८१ दिव्यांग कुटुंबांना शौचालयासाठी लागणा-या आधुनिक सुविधा पुरवण्यात येणार आहेत. त्यासाठी स्वच्छ भारत अभियानासह स्थानिक स्वराज्य संस्थांकडील दिव्यांगांसाठी राखीव असणाºया तीन टक्के निधीची तसेच विविध कंपन्यांकडील सीएसआरची मदत घेतली जाणार आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी अशी नावीन्यपूर्ण संकल्पना राबवणारी रायगड जिल्हा परिषद राज्यामध्ये एकमेव ठरणार आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यातील १४ जिल्हे आतापर्यंत हागणदारीमुक्त झाले आहेत. रायगड जिल्हा हा त्यातील १४ वा जिल्हा ठरला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक वर्षापूर्वीच प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले आहे. त्यापाठोपाठ दुसºया स्थानावर कोल्हापूर आणि नंतर सातारा जिल्ह्याचा समावेश आहे. रायगड जिल्ह्याला पहिल्या दहामध्ये स्थान मिळाले असते मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांची उदासीनता याला कारणीभूत ठरली आहे. अलिबाग, पेण आणि कर्जत हे तालुके हागणदारीमुक्तीमध्ये मागे होते. त्यामुळे रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी कर्जत तालुका दत्तक घेतला होता. पेण तालुका निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी, तर अलिबाग तालुका तत्कालीन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश गोटे यांनी घेतला होता. गोटे यांची बदली झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी हे आव्हान पेलले. रायगड जिल्ह्यामध्ये तीन लाख ४३ हजार ४८८ वैयक्तिक शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये भविष्यात स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सातत्य राखण्यासाठी आता रायगड जिल्हा परिषदेने ‘व्हिजन २०२२’ आखले आहे. या माध्यमातून जिल्ह्यामध्ये विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जाणार आहेत.शाश्वत स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत स्वच्छतेमध्ये सातत्य राखणे, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, मासिक पाणी व्यवस्थापन, प्लॅस्टिकमुक्त मोहीम, हॅण्ड वॉश स्टेशनची शाळांमध्ये उभारणी करणे अशा योजनांचा त्यामध्ये समावेश आहे. त्याच्या पुढे जात रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी दिव्यांगांच्या शौचालयांसाठी आधुनिक सुविधा देण्याची संकल्पना मांडली आहे. रायगड जिल्ह्यात २०१२ साली झालेल्या बेस लाइन सर्व्हेनुसार ५८१ दिव्यांग कुटुंंब आढळले आहेत. या सर्व कुटुंबांकडे शौचालयाची सुविधा आहे. परंतु दिव्यांगांना शौचालयात जाताना अनेक त्रासाला सामोरे जावे लागते. यासाठी शौचालयासाठी रँप उभारणे, कमोड सिस्टीमचे टायलेट बांधणे, पाण्याची व्यवस्था करणे, हात नसणाºया दिव्यांगांसाठी शौचालयामध्ये सेंसर बसवणे यासह अन्य सुविधा देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केला जाणार आहे.रायगड जिल्ह्यात झालेल्या बेस लाइन सर्व्हेनुसार ५८१ दिव्यांग कुटुंब असल्याचे आढळले आहे. परंतु काही कुटुंबांमध्ये दिव्यांग व्यक्ती असतात. त्यांनाही अशा सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांची माहितीही पाणी व स्वच्छता विभागामार्फत घेतली जात आहे. त्यामुळे ही संख्या वाढणार असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे कार्यक्रम समन्वयक जयवंत गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.शौचालयासाठी आवश्यक असलेल्या आधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी स्वच्छ भारत अभियानासाठी येणारा निधी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी अपंग कल्याणासाठी राखून ठेवलेला तीन टक्के निधी, चौदाव्या वित्त आयोगातील निधी, तसेच विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातील निधी दिव्यांगांच्या आधुनिक सुविधेसाठी खर्च केला जाणार आहे.
शौचालयासाठी दिव्यांग कुटुंबांना आधुनिक सुविधा, रायगड जिल्हा परिषदेचे ‘व्हिजन २०२२’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 2:13 AM