पारंपरिक होळी सणाला आधुनिकतेची जोड, खारेपाटात सावरीच्या लाकडाची होळी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 04:05 AM2019-03-20T04:05:29+5:302019-03-20T04:05:43+5:30
रायगड जिल्ह्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नाचगाण्याचा कार्यक्रम असल्याने या वेळी डीजेचा वापर केला जात असून पारंपरिक वाद्याबरोबर डीजे, लेझर लाइट आधुनिकतेची साथ होळी उत्सवाला मिळत आहे.
वडखळ - रायगड जिल्ह्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नाचगाण्याचा कार्यक्रम असल्याने या वेळी डीजेचा वापर केला जात असून पारंपरिक वाद्याबरोबर डीजे, लेझर लाइट आधुनिकतेची साथ होळी उत्सवाला मिळत आहे.
रायगड जिल्ह्यात होळी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात असून खारेपाटात विशेषत: सावरीच्या झाडाच्या लाकडाची होळी जंगलातून आणली जाते. ही होळी आणण्यासाठी गावातील तरुण मंडळीसोबत ज्येष्ठ मंडळी सुद्धा जंगलात जातात. या वेळी जंगल सफर होत असून वनभोजनाचा कार्यक्र म आखला जातो. होळीच्या पाच दिवस अगोदर होळी गावात नाचत गाजत गुलाल उधळत आणली जाते. होळीची सजावट करून होळी उभी केली जाते, परिसराची सजावट व रोषणाई केली जाते. होळीच्या दिवशी स्त्रिया पारंपरिक वेशभूषा करून होळीची पूजा करतात व रात्री १२ वाजता होळीचा होम रचून होळी लावली जाते. या वेळी महिला होळीची पारंपरिक गाणी गातात. होळीमध्ये नारळ टाकले जातात तद्नंतर या नारळाचा प्रसाद सर्वांना वाटला जातो. होळी उत्सवात रंगपंचमीपर्यंत विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात येते. या वेळी फनी गेम, कबड्डी स्पर्धा, नृत्य स्पर्धा, सोंग काढणे अशा विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात येते. तर होळीचा होम सतत पाच दिवस जळत ठेवण्यात येतो.
पारंपरिक पद्धतीने संस्कृती जपण्याचा प्रयत्न
म्हसळा : मोठ्या होळीच्या नऊ दिवस अगोदरपासून होळी उत्सवास सुरु वात होते. नऊ दिवस अगोदरपासून रोज छोटी होळी लावण्यात येते त्याला पिलू लावणे असे म्हणतात. होळीला शिमगा या नावानेही संबोधले जाते. पूर्वी म्हसळा तालुक्यातील एकूण ८४ गावांपैकी जवळजवळ ५० ते ५५ गावांतून विविध प्रकारचे नाच (खेळे) शहराच्या मुख्य ठिकाणी म्हणजेच म्हसळा येथे येऊन आपली कला प्रदर्शित करायचे. त्यामुळे खास होळीचा बाजार भरविण्याची प्रथा होती, काही गावातून ही परंपरा जुन्या लोकांनी आजही टिकवून ठेवली आहे. म्हसळा तालुक्यातील केलटे गावामध्ये ही परंपरा आजही जशीच्या तशी सुरू असल्याचे किसन पवार यांनी सांगितले.
शिमगोत्सव खरेदीसाठी फुलला बाजार
पेण : रायगड जिल्ह्यातील शिमगोत्सव तथा होळीचा सण साजरा करण्याची लगबग सुरू झाली आहे. आगरी कोळी समाज बांधवांचा कोकणातील हा शेवटचा वर्षाखेरीचा सण असल्याने वर्षपूर्तीच्या सणाचा आनंद उपभोगण्यासाठी सर्व जण तयार झाले असून, ग्रामदेवतांच्या पालख्या व गावोगावी होळ्यांची उभारणी करण्याची तयारी पूर्ण होऊन पेणमध्ये २७८ होळ्यांची उभारणी झालेली आहे.
कोळीवाड्यात होळीचा पंचमीपर्यंतचा सण असल्याने सण आयलाय गो होळी पुनवेचा, आनंद मावेना कोळ्यांच्या पोरांचा अशी लोकगीते, कोळीगीतांची आठवणी जागृत करणारा हा सण धावपळीच्या जीवनप्रवासात क्षणिक सुखांच्या आठवणींचा उजाळा देतो.
पेणच्या बाजारात सोमवारी सणासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी गर्दी दिसून आली. रंग, पिचकाऱ्या, फुले, वेण्या, गजरे, मिठाई, कपडे व इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.