एकादशीच्या कीर्तनातून आधुनिक लोकजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 04:08 AM2018-05-03T04:08:45+5:302018-05-03T04:08:45+5:30
भारतवर्षात नारदमुनींनी कीर्तनाचा आरंभ केला. नारदमुनींनी ते महर्षी व्यासांना शिकवले
अलिबाग : भारतवर्षात नारदमुनींनी कीर्तनाचा आरंभ केला. नारदमुनींनी ते महर्षी व्यासांना शिकवले, व्यास महर्षींनी शुकास शिकवले आणि पुढे त्याचा सर्वत्र प्रसार झाला, अशी कीर्तन परंपरा सांगितली जाते. अनेकदा कीर्तनाच्या माध्यमातून लोकजागृती करण्यात आली आहे. कीर्तनाची हीच परंपरा आधुनिक काळात आबाधित राखण्याकरिता अलिबागमध्ये कीर्तनकार अॅड. श्रीराम ठोसर, नवकीर्तनकार महेश्वर देशमुख आदीनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या सहयोगाने श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात ‘एकादशी कीर्तन’ परंपरेस प्रारंभ केला आहे.
महाराष्ट्रात कीर्तनाची परंपरा पूर्वापार आहे. येथे होणाऱ्या कीर्तनात ‘नारदीय कीर्तन’ आणि ‘वारकरी कीर्तन’ असे दोन मुख्य प्रकार आहेत. नारद हे भारतातील आद्य कीर्तनकार मानले जातात. ही नारदीय कीर्तन परंपरा एकादशी कीर्तनातून पुढे नेण्याचा प्रयत्न असल्याचे महेश्वर देशमुख यांनी सांगितले.
दरमहिन्यात दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचे स्वतंत्र नाव आणि अस्तित्व आहे. त्यास अनुसरूनच ‘एकादशी कीर्तन’ परंपरेचा शुभारंभ ११ फेबु्रवारी रोजी विजया एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात सुप्रसिद्ध कीर्तनकार विजयबुवा सोमण यांच्या कीर्तनाने करण्यात आला. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी आमली एकादशीच्या दिवशी महिला कीर्तनकार उषा पटवर्धन यांचे कीर्तन झाले. या दोन कीर्तनकारांनंतर नवोदित कीर्तनकारांना या परंपरेत जाणीवपूर्वक आणण्याच्या हेतून सर्व एकादशींना नवोदित कीर्तनकारांची कीर्तने ठेवण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.
पहिल्याच कीर्तनात ‘झिरो बजेट शेती’चा पर्याय
११ व २६ फेब्रुवारीच्या प्रारंभाच्या दोन कीर्तनानंतर १३ मार्च रोजीच्या पापमोचनी एकादशीच्या दिवशी देशमुख यांनी वयाच्या ६०व्या वर्षी कीर्तन कला अवगत करून घेऊन ‘झिरो बजेट शेती’ या विषयावरील पहिले कीर्तन सादर केले. त्यानंतर २७ मार्च रोजीच्या कामदायी एकादशीला नवकीर्तनकार संजय रावळे यांचे आधुनिक काळाशी श्रीकृष्णाचा संदर्भ सांगणारे कीर्तन, १२ एप्रिल रोजी वरोथिनी एकादशीच्या दिवशी काशिनाथ क्रमवंत यांचे आधुनिक काळाशी श्रीरामाचा संदर्भ सागणारे कीर्तन, तर २६ एप्रिल रोजी मोहिनी एकादशीच्या दिवशी गजानन दाते यांचे आधुनिक काळाशी श्री विठ्ठलाचा संदर्भ सागणारे कीर्तन झाले. येत्या ११ मे रोजीच्या अपरा एकादशीच्या दिवशी अलिबागमधील अॅड. कला पाटील यांनी आयुष्यातील पहिले कीर्तन श्री विठ्ठल मंदिरात भक्तसेवेत रुजू करणार आहेत.