- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : गेल्या काही दिवसांत सातत्याने सिलिंडरच्या दरांमध्ये वाढ होत असल्याने गृहिणींचे अर्थकारण बिघडले आहे. मात्र, नुकतीच सिलिंडरच्या दरामध्ये १० रुपये घट करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरात तब्बल २२५ रुपये दर वाढवण्यात आले असून १० रुपयांची स्वस्ताई दाखवत चलाखी करण्यात आल्याने गृहिणींसह नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती जाहीर करतात. गेल्या चार महिन्यांत पहिल्यांदाच या सिलिंडरच्या किमतीत कपात झाली आहे. गेल्या वर्षभरात २२५ रुपयांनी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे, तर ४ फेब्रुवारी रोजी या सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांची वाढ झाली. १५ फेब्रुवारी रोजी ५० रुपये वाढले. त्यानंतर २५ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी २५ रुपयांनी किमती वाढल्या होत्या.लॉकडाऊन काळात रोजगार हिरावल्याने नागरिकांना आर्थिक चणचण सहन करावी लागली. शिवाय या घरगुती गॅस सिलिंडरवर मिळणारे अनुदानही शासनाने बंद केल्याने आर्थिक गळचेपी झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. सामान्य नागरिक पुन्हा एकदा चूल पेटवण्याकडे वळला. काही राजकीय पक्षांनी या दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनही केले. दरम्यान, आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांकरिता सिलिंडर किमतीतील घट दिलासा देणारी बाब असली, तरी केवळ १० रुपयांचीच कपात झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या तोंडाला पाणी पुसल्याची चर्चा सगळीकडे रंगत असून नाराजीचा सूर उमटत आहे.घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत टप्प्याटप्प्याने वाढ नोंदविण्यात आल्याने स्वयंपाक घराचे आर्थिक नियोजन बिघडले. त्यामुळे महिन्याचे आर्थिक वेळापत्रक कोलमडले असून किराणा खरेदीबाबत तडजोड करावी लागली. - स्नेहल पाटील, गृहिणीएकीकडे सिलिंडरच्या किमतीत वाढ होत असताना, स्वयंपाकाच्या गॅसचे अनुदान बंद केल्याने आगीतून फुफाट्यात पडल्याची गत गृहिणींनी अनुभवली. त्यामुळे ग्रामीण भागात चूल पेटविण्याचे प्रमाणही वाढले आहे. - करुणा खाटा, गृहिणी, बोर्डीमागील काही महिन्यांत झालेली भाववाढ आणि त्यानंतर केवळ १० रुपयांनी सिलिंडरच्या किमतीत केलेली घट नक्कीच दिलासादायक बाब नाही. - अमरिता सुरती, गृहिणी, चिखले
याला म्हणतात चलाखी! मोदी सरकारनं तुमच्या खिशातून २२५ रुपये काढले अन् १० रुपयेच दिले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 12:29 AM