रायगड - मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या नवव्या राज्यस्तरीय अधिवेशन कार्यक्रमात पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. आम्हाला दोन कोटी रोजगार द्या, स्वामीनाथन आयोग लागू करा, आम्ही रस्त्यावर उतरणार नाही. आज शेतकऱ्याचा मुलगा कष्टाने परीक्षेत अधिक मार्क मिळवतो. पण, त्याच्या नोकरीचा प्रश्न सुटत नाही. आज देशातील शिक्षणव्यवस्था आणि रोजगार यांची अवस्था अशी बनलीय, जणू देशाचं संविधान टाय-टाय फिश झालंय, अशा शब्दात हार्दिक पटेल यांनी सरकारवर जहाल टीका केली.
आपल्या देशाचं संविधान का बनविण्यात आलं?. सर्वांना बरोबरीचा वाटा मिळावा, सर्वांना न्याय मिळावा, यासाठी देशाचं संविधान बनविण्यात आलं. छत्रपती शाहू महाराज आरक्षणाचे जनक होते. आरक्षण लागू केलं, त्यावेळी त्यांनीही ज्या समाजाची संख्या अधिक त्या समाजाला तेवढा वाटा मिळेल असं म्हटल्याचे हार्दिक यांनी सांगितले. जिसकी जितनी संख्यादारी, उसकी उतनी भागिदारी, जोपर्यंत हे गणित लागू होत नाही. तोपर्यंत कुणालाही बरोबरीचा वाटा या देशात मिळणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शासन कसं असावं हे जगाला दाखवून दिलयं. पण, आताचे शासन कसं वागतयं हे आपल्याला माहितच आहे. मराठा, धनगर आणि मुस्लीम समाज आरक्षणाची मागणी करत आहे. मात्र, या समाजाला आरक्षण का पाहिजे, याचा अभ्यास करणेही गरजेचे असल्याचे हार्दिक पटेल यांनी म्हटले. तसेच, जे लोक शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकही करत नाहीत, ते लोक महाराष्ट्रावर राज्य करीत आहेत, असे म्हणत हार्दिक यांनी फडणवीस सरकारवर टीका केली.