माथेरान : माथेरानमध्ये भूमिगत विजेच्या केबल्स टाकलेल्या आहेत, परंतु अधिक क्षमतेच्या डीपी उघड्या अवस्थेत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.माथेरानमधील सततची वर्दळ असलेल्या महात्मा गांधी मार्ग या मुख्य रस्त्यालगत बाजारपेठेच्या मध्यवर्ती ठिकाणी वीज वितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मर आहेत, परंतु ते संरक्षण जाळ्याविनाच उघड्यावर असल्याने अनेकदा माकडांच्या मर्कटलीला सुरू असताना नेहमीच या उघड्या ट्रान्सफॉर्मरमुळे शॉक लागून माकडांना आपल्या प्राणास मुकावे लागत आहे. बऱ्याच वेळा या ट्रान्सफॉर्मरजवळच कचरा टाकला जात असून खाद्याच्या शोधात माकडे आणि त्यांची पिल्ले नकळत शॉक लागून नेहमीच मृत्यू पावत आहेत. भूमिगत केबल असताना सुद्धा अनेक भागात विजेचे जीर्ण पोल केव्हाही कोसळतील अशाच स्थितीत आहेत. शालेय विद्यार्थ्यांची नेहमीच रेलचेल असते, तसेच पर्यटकांची वर्दळ असणाऱ्या ठिकाणी अतिवृष्टीच्या वेळी हेच पोल कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात तर ठरावीक डीपी असलेल्या जागा खूपच धोकादायक असून शॉर्टसर्किटमुळे सुद्धा वीज जात आहे. पर्यटक सायंकाळी खरेदीसाठी आल्यावर अंधारामुळे पुरते गोंधळून जातात आणि खरेदीविनाच आपापल्या खोल्यांकडे प्रस्थान करीत आहेत. याचा विपरीत परिणाम व्यावसायिक, दुकानदारांना सहन करावा लागत आहे. माथेरानमध्ये जरी शून्य भारनियमन असले तरीसुद्धा अशा प्रकारांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी या भागात संरक्षक जाळ्या बसविल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊन वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
शॉक लागून माकडाचा मृत्यू
By admin | Published: February 23, 2017 6:22 AM