महिनाभरात घरफोडीच्या गुन्ह्याची उकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 10:34 PM2019-12-20T22:34:54+5:302019-12-20T22:34:56+5:30
कर्जत पोलिसांना यश : उत्तर प्रदेशातून आरोपीस अटक; अन्य दोघांचा शोध सुरू
कर्जत : महिनाभरापूर्वी कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मोबाईलचे दुकान फोडून चोरट्यांनी ऐवज पळविला होता. त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
कर्जत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आशापुरा मोबाईल शॉपी हे दुकान आहे. ८ नोव्हेंबर २०१९ रोजी चोरट्यांनी दुकानाच्या लोखंडी शटरचे कुलूप तोडून महागडे मोबाईल, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड, फास्टट्रॅक, सोनाटा कंपनीचे महागडे घड्याळ, तसेच इतर वस्तू चोरी करून पलायन केले होते. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यामध्ये दुकानाचे मालक वीराराम मंजीराम पुरोहित यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे हे करीत होते. पोलीस शिपाई भूषण चौधरी यांनी तांत्रिक पुरावा गोळा करून गुन्ह्यातील आरोपींचे लोकेशन उत्तर प्रदेश असल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे, पोलीस हवालदार संदेश सानप, पोलीस शिपाई भूषण चौधरी, पोलीस शिपाई गणेश पाटील यांचे पथक उत्तर प्रदेश येथे रवाना झाले. त्यांनी आरोपी करीम नुरूउद्दीन खान राहणार मुंब्रा, मूळ गाव उत्तर प्रदेश येथून पकडले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, गुन्ह्यातील चोरलेल्या ऐवजापैकी एकूण ७६ हजार ४८० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. अधिक चौकशीत त्याच्यासोबत इतर दोन साथीदारांची नावे निष्पन्न झाली असून, पोलीस त्या दोघांचा शोध घेत आहेत.