उरण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील सहा महिन्यांपासून बंद करण्यात आलेली मोरा-भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक गुरुवार, ३ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचे पालन करण्याच्या अटींवरच प्रवासी वाहतुकीस शासनाने परवानगी दिली असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक पी. बी. पवार यांनी दिली.या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक सेवा पावसाळी हंगामात दरवर्षी जून ते आॅगस्टदरम्यान बंद ठेवण्यात येते. या वर्षी मात्र लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासूनच वाहतूक बंद करण्यात आली होती. ही सेवा पावसाळी बंदीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवासी, कामगारांकडून करण्यात येत होती. अखेर ३ सप्टेंबरपासून ही सागरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा निम्म्या प्रवाशांना नेणार असून दररोज परतीच्या एकूण १२ फेऱ्या होणार असल्याचे मोरा बंदर निरीक्षक पी. बी. पवार यांनी सांगितले.
मोरा-भाऊचा धक्का सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक सहा महिन्यांनी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 2:03 AM