मोरबे-करंबेळी रस्ता खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 12:06 AM2020-08-27T00:06:13+5:302020-08-27T00:06:20+5:30
पनवेलच्या ग्रामीण भागातील काही रस्त्यांची अत्यंत वाईट दुर्दशा झाली आहे. पंतप्रधान सडक योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या मोरबे ते करंबेळी या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे
नवीन पनवेल : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून बांधण्यात आलेला मोरबे ते करंबेळी रस्ता खड्ड्यात गेला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहने चालवायची कशी, असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे.
पनवेलच्या ग्रामीण भागातील काही रस्त्यांची अत्यंत वाईट दुर्दशा झाली आहे. पंतप्रधान सडक योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या मोरबे ते करंबेळी या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहन चालकांना त्याचा त्रास होत आहे. तालुक्यातील खैरवाडी, कोंडले, येरमाळ, गारमाळ, करंबेळी, फणसवाडी, भल्याची वाडी आदी ठिकाणच्या हजारो आदिवासींना वर्षानुवर्षे या रस्त्यावरूनच पायपीट करावी लागत होती. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या या रस्त्यामुळे हा पायपिटीचा वनवास संपला. मात्र, सद्यस्थितीत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आदिवासींना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवला असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला आहे.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ३ कोटींहून अधिक रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या रस्त्याची लांबी ७.९०५ किलोमीटर आहे. या रस्त्यामुळे ८ ते १० आदिवासी वाड्या एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने आदिवासी बांधव निराश झाले आहेत. त्यामुळे हे खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.