पनवेल : कोरोनामध्ये प्रदीर्घ काळापासून बंद असलेल्या शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी २२ जानेवारी रोजी काढलेल्या परिपत्रकात पालिका क्षेत्रातील ५ वी ते १२ पर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोविडचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. पालिकेच्या स्वतःच्या १० शाळांसह संपूर्ण पालिका क्षेत्रात सर्वच माध्यमांच्या २५० पेक्षा जास्त शाळा आहेत. कोविडच्या प्रादुर्भावामुळे अनेक महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे.या ऑनलाइन शिक्षणापासून शिक्षक ,विद्यार्थी व पालकांची सुटका होणार आहे. दि.२७ जानेवारीपासून या शाळा सुरू करण्यास पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी परवानगी दिली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून या शाळा सुरू करण्यास देण्यात आली आहे. याकरिता शिक्षकांची कोविड चाचणी यापूर्वीच शासनाने अनिवार्य केली आहे. विशेष म्हणजे कोविड संदर्भात मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे पालिकेने काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.
पालिका क्षेत्रात ५ वी ते १२वी पर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. आयुक्तांनी यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. शाळा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या शालेय व्यवस्थापन समितीने यासंदर्भात एकत्रित बैठक घेऊन निर्णय घ्यावा. - बाबासाहेब चिमणे, शिक्षणाधिकारी, पनवेल महानगरपालिका