लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : काही वर्षांपर्यंत दक्षिण रायगडमधील महाड, माणगाव तालुक्यात तरुण सुरक्षा दलांमध्ये भरती व्हावे यासाठी अग्रेसर होते. आता या दलांचे आकर्षण संपूर्ण जिल्ह्यात दिसून येत आहे. त्यामुळे हजारपेक्षा अधिक तरुण दररोज कसून सराव करत आहेत.
भारतीय लष्कराबरोबर आरपीएफ आणि अन्य सुरक्षा दलात नोकरी मिळविण्यासाठी अनेक तरुण धडपड करत आहेत. त्यातही पोलिस दलाचे आता अधिक आकर्षण आहे. त्यामुळेच हे स्वप्न उराशी बाळगून हजारपेक्षा अधिक तरुण-तरुणी तयारी करत आहेत.
त्यानुसार शारीरिक क्षमतेची तयारी करण्यासाठी ऐन उन्हाळ्यात घाम गाळताना दिसून येत आहेत. पहाटेपासून कुणी रस्त्यावर तर कुणी जिल्हा स्टेडियम, गाऊंड येथे पोलिस भरतीची तयारी करताना दिसून येत आहेत. पूर्वी पोलिस भरतीमध्ये तरुणींची संख्या अल्प असायची; मात्र आता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तरुणांच्या बरोबरच तरुणीही पोलिस भरतीसाठी शारीरिक क्षमता चाचणीची तयारी करण्याची ग्राऊंडवर दिसून येत आहेत.आपल्या मुलांना चांगली नोकरी मिळावी, असे पालकांचे स्वप्न असते. स्वतः मोलमजुरी करत व काबाडकष्ट करून पाल्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.रोजगाराला प्राधान्यमहसूलसह इतर विभागांच्या जागा सध्या निघत नाहीत. कोणत्या विभागाच्या जागा निघाल्या तरी जागा कमी व युवकांची संख्या जास्त असते. त्यामुळे बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पोलिस शिपायाची तरी नोकरी मिळावी, यासाठी सर्वच युवक कसून सराव करीत असल्याचे दिसून येते. येथील आरसीएफ मैदान, समुद्र किनाऱ्यावरील वाळूत गोळा फेकण्याचा सराव करताना तरुण दिसून येत आहेत.पोलिस होण्याचे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. शारीरिक क्षमता चाचणी व लेखी परीक्षेचा अभ्यास करीत आहे. सध्या मैदानी चाचणी परीक्षेची जोरदार तयारी करीत आहे. या परीक्षेत यश संपादन करणे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे.- रुचित पाटील, अलिबागपोलिस भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या तरुण- तरुणांना तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन मिळतेच असे नाही. म्हणूनच अनेक जणांचे पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न भंग पावते. त्यामुळे अशा तरुण-तरुणींसाठी प्रशिक्षणाची ही गरज ओळखून जिल्हा पोलिस दलामार्फत पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण मोफत शिबिराचे आयोजन गेल्यावर्षी करण्यात आले होते. त्यामध्ये ३०० हून अधिक तरुण- तरुणींनी सहभाग घेतला. यावर्षी देखील असे शिबिर आयोजित करण्यात येईल.- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक