अमोल पाटील, खालापूररायगड जिल्ह्यात चौकजवळील हातनोली गावातील शेतपीक नवी मुंबई महानगरपालिका धरण प्रशासनाकडून उद्ध्वस्त करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी सध्या चांगलाच संकटात सापडला आहे.चौक येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून १९८९ मध्ये मोरबे धरण बांधण्यात आले. त्यानंतर हे धरण नवी मुंबई महानगरपालिकेला विकण्यात आले. धरणासाठी जागा संपादित करताना चौक गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावात घेण्यात आल्या होत्या. यावेळी धरणग्रस्त शेतकऱ्यांना नोकऱ्या, १२ टक्के भूखंड देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र या मागण्या अजूनही प्रलंबितच आहेत. धरणाच्या बाधित क्षेत्रापासून काही भूखंड मोकळे आहेत. त्याठिकाणी शेतकऱ्यांकडून भातपीक, भाजीपाल्यांची लागवड केली जाते. या पिकावरच बाधित शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. सध्या शेतकऱ्यांनी याठिकाणी काकडीचे पीक लावले आहे. चांगले पीक यावे म्हणून कुटुंबासह गेली दोन महिने भरपावसात मेहनत घेत आहेत. मात्र शुक्रवारी धरण प्रशासनाने काकडी पीक उद्ध्वस्त केले. त्यामुळे धरणग्रस्त शेतकरी हवालदिल झाला आहे. धरण क्षेत्र परिसरातील ही जमीन ओसाड पडून होती. त्यामुळे धरणग्रस्त बाधित शेतकऱ्यांनी याठिकाणी पीक घेण्यास सुरुवात केली. धरणासाठी सरकारने जमीन कवडीमोल भावाने घेतली आणि धरण बांधल्यावर उर्वरित जमीन तशीच पडून आहे. ही जमीन शेतकऱ्यांना परत करावी, इतकेच नव्हे तर काकडी पिकाच्या झालेल्या नुकसानीचीही भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आमदार मनोहर भोईर यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली. यावेळी जि. प. सदस्य सुरेखा ठोंबरे, उपसभापती श्यामसुंदर साळवी, माजी सदस्य मोतीराम ठोंबरे आदी उपस्थित होते. धरण प्रशासन अधिकाऱ्यांचा निषेध करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईबाबत दिलासा दिला. याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
मोरबे धरण क्षेत्रातील शेती उद्ध्वस्त
By admin | Published: August 08, 2016 2:35 AM