रायगड जिल्ह्यात डासांचा जाच वाढला; हत्तीरोगाचे २२९ रुग्ण आढळले
By निखिल म्हात्रे | Published: June 28, 2024 02:56 PM2024-06-28T14:56:01+5:302024-06-28T14:56:23+5:30
पायावर सूज येणे, ताप येणे, पाय लालबुंद होणे, पायाच्या दोन बोटांमध्ये चिखल्या आजाराप्रमाणे जखमा होणे अशी टप्प्याने रुग्णांत लक्षणे दिसून येतात. पायाच्या सुजेवरून तीव्रता तपासून दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करण्याचे आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या संचालकांनी दिले आहेत.
अलिबाग : हत्तीरोगाचे रायगड जिल्ह्यात २२९ रुग्ण आहेत. हा आजार समूळ नष्ट करण्यासाठी अनेक मोहिमा राबवून तो जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. अलिबाग आणि पनवेल तालुक्यात त्याचे सर्वाधिक रुग्ण आहेत. ‘क्युलेक्स’ प्रजातीच्या डासांपासून हत्तीरोग हा आजार होतो. सामाजिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आजार आहे. यामध्ये रुग्णांच्या पायावर सूज येऊन हालचालींवर एका प्रकारचे निर्बंध येतात. इतरांच्या मदतीशिवाय हे रुग्ण हालचाल करू शकत नाही.
पायावर सूज येणे, ताप येणे, पाय लालबुंद होणे, पायाच्या दोन बोटांमध्ये चिखल्या आजाराप्रमाणे जखमा होणे अशी टप्प्याने रुग्णांत लक्षणे दिसून येतात. पायाच्या सुजेवरून तीव्रता तपासून दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करण्याचे आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या संचालकांनी दिले आहेत. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात २२९ रुग्ण आहेत. ४० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व आलेल्या या आजाराच्या रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यासाठी रुग्णांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने गावातील कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. सीएससी सेंटरवर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी रुग्णास आधार कार्ड, रेशन कार्ड, दोन पासपोर्ट फोटो या कागदपत्रांसह रक्त गट, मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे. शिबिरास येताना ऑनलाइन केलेल्या अर्जाची प्रत सोबत आणणे गरजेचे आहे.
रायगडमधील हत्तीरोग रुग्णांची संख्या
अलिबाग- ५६, उरण- ३१, पनवेल- ४७, कर्जत- ७, खालापूर- ९, सुधागड- ५, पेण- २८, मुरूड- १२, रोहा- ११, माणगाव- १२, तळा- १, म्हसळा- १, श्रीवर्धन- १, महाड- ४, पोलादपूर- ४, एकूण- २२९
हत्तीरोगाची लक्षणे
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, हत्तीरोगाच्या लक्षणाच्या चार अवस्था असतात. जंतू शरीरात शिरकाव केल्यानंतर आजाराची लक्षणे दिसून येऊ शकतात.
लक्षणविरहित किंवा वाहक अवस्थेमध्ये रुग्णाच्या रात्री घेतलेल्या रक्ताच्या नमुन्यात मायक्रो फायलेरिया आढळून येतात. मात्र, रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. तीव्र लक्षण अवस्थेत ताप येतो, लसिकाग्रंथींचा दाह सुरू होतो.
वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे हत्तीरोगाच्या रुग्णांची जिल्हा रुग्णालयात तपासणी करून ज्याचे अपंगत्व ४० टक्के पेक्षा जास्त आहे, त्यांना दिव्यांगांचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच हत्तीरोग जिल्ह्यातून हद्दपार व्हावा, यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
-राजाराम भोसले, जिल्हा हिवताप अधिकारी, रायगड