अलिबाग : गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात दाखल होऊ लागले आहेत. त्यांच्या प्रवास सुखकर व्हावा, यासाठी एसटी महामंडळाने तब्बल २ हजार ५०० विशेष एसटी उपलब्ध करून दिल्या आहेत.गणेशभक्तांसाठी एसटीच्या जादा गाड्या ८ सप्टेंबरपासूून सुरू झाल्या आहेत. संगणकीय आरक्षणाबरोबरच ग्रुप बुकिंगची सोय देखील एसटी महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथून या एसटी बसेस सोडण्यात येत आहेत. दरम्यान, रायगड एसटी विभागातून १५० एसटी बसेस मुंबई, ठाणे व पालघर विभागाला चाकरमान्यांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.८ सप्टेंबर रोजी १३ तर ९ सप्टेंबर रोजी ७५ एसटी बसेस कोकणात रवाना झाल्या आहेत. सोमवार १० सप्टेंबर रोजी ३५५, ११ सप्टेंबर रोजी सर्वाधिक १,५३९ बसेस रवाना होणार आहेत. १२ सप्टेंबर रोजी २०४ तर १३ सप्टेंबर रोजी ३९ बसेस सोडण्यात येणार आहेत.२ हजार ५०० एसटी बसेसपैकी मुंबई विभागातून १ हजार १२५, ठाणे विभागातून ८७८ तर पालघर विभागातून २२२ गाड्या अशा एकूण आगाऊ आरक्षित २ हजार २२५ एसटीच्या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था विचारात घेऊन एसटीबसेस बंद पडण्याची समस्या येऊ नये आणि आलीच तर तत्काळ उपाययोजना करता यावी याकरिता रायगड एसटी विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून वाकण, इंदापूर, कशेडी येथे गस्तीपथके ठेवण्यात आली आहेत.>परतीचीही सोयगणेशोत्सवानंतर कोकणातून परत मुंबईला जाण्यासाठी १७ ते २३ सप्टेंबर या दरम्यानही परतीच्या प्रवासासाठी जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.एसटी बसेसबरोबरच खासगी बसेस व वाहनांचे प्रमाण देखील गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाढले असून, वाहतूक नियंत्रणाकरिता पनवेल ते कशेडी या दरम्यान रायगड वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त व गस्तीपथके तैनात करण्यात आली आहेत.
गणेशोत्सवासाठी आज सुटणार सर्वाधिक बसेस, एसटीकडून २,५०० बसेसची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 5:11 AM