कर्जतमधील बहुतांश सीसीटीव्ही नादुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:52 AM2017-08-01T02:52:32+5:302017-08-01T02:52:32+5:30
मागील वर्षभरात कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात मंगळसूत्र खेचणे, दिवसाढवळ्या घरफोड्या, रात्री दुकानाचे शटर वाकवून होणाºया चोºया, वाहनांची चोरी अशा एक ना अनेक चोºयांचे प्रमाण वाढले आहे.
नेरळ : मागील वर्षभरात कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात मंगळसूत्र खेचणे, दिवसाढवळ्या घरफोड्या, रात्री दुकानाचे शटर वाकवून होणाºया चोºया, वाहनांची चोरी अशा एक ना अनेक चोºयांचे प्रमाण वाढले आहे. असे असूनही कर्जत पोलीस यंत्रणेला त्याचा छडा लावण्यासाठी कर्जत पोलिसांनी व्यापारी, तसेच इमारतीतील रहिवाशांना आपापल्या परिसरात सीसीटीव्ही बसविण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक व्यापारी, रहिवासी तसेच काही लोकप्रतिनिधी पुढाकार घेत स्वखर्चाने त्या त्या प्रभागात सीसीटीव्ही बसवले, परंतु सद्यस्थितीत यातील काही सीसीटीव्ही हे नादुरु स्त असून फक्त शोभेचे ठरत आहेत. यामुळे एखादा गुन्हा घडल्यास सीसीटीव्हीद्वारे घडलेल्या गुन्ह्याचा मागोवा घेण्यास अडचण होईल.
रेल्वे मार्गावर कर्जत असल्याने शहरात गुन्हा करून त्वरित लोकल अथवा मेलने गुन्हेगाराला पळून जाणे सहज शक्य होते. त्यामुळे मागील काही काळापासून येथील गुन्हेगारीत लक्षणीय वाढ झाली आहे. काही वेळेस एका रात्रीत पाच ते सहा दुकाने फोडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर मुद्रे दहिवली भर बाजारपेठेत सुद्धा दिवसाढवळ्या घरफोड्या करून लाखो रु पयांचे सोने, रोख रकमा घेऊन चोरटे पसार झाले आहेत. याचप्रमाणे बँकेत भरणा करायला आलेल्या नागरिकांची दिशाभूल तसेच हातचलाखी करत लुटण्याचे प्रकारही घडले आहेत. निर्जन रस्त्यावरून ये - जा करणाºया महिलांची टेहाळणी करून भरधाव वेगाने दुचाकीवरून मंगळसूत्र खेचण्याच्या अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. मात्र या गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना काही अंशी यश आले असले तरीही अनेक गुन्ह्यांचा तपास आजही प्रलंबित आहेत.
शहरात चारफाटा, श्रीरामपूल, कपालेश्वर मंदिर, भिसेगाव, गुंडगे तसेच शासकीय कार्यालयामध्येही सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. काही लोकप्रतिनिधींनीतर मोठा गाजावाजा करत आमदारांच्या हस्ते उद्घाटन करत काही सीसीटीव्ही बसविले. मात्र खेद आणि आश्चर्याची बाब म्हणजे काही सीसीटीव्ही काही काळातच नादुरु स्त झाले आहेत. काही सुरू आहेत पण त्यामध्ये रेकॉर्डिंग होत नसल्याने फक्त थेट प्रक्षेपण दिसत असले तरी गुन्हा घडून गेल्यावर या थेट प्रक्षेपणाचा गुन्ह्याचे धागेदोरे शोधण्यात याचा काहीच उपयोग होत नाही.
तरी याची योग्य ती दखल घेऊन नादुरु स्त सीसीटीव्ही पुन्हा पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.