लोकमत न्यूज नेटवर्कबिरवाडी : महाडजवळील चांढवे बुद्रुक गावच्या हद्दीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६वर, ८ जून रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पोलादपूरकडून महाडच्या दिशेला जाणाऱ्या कारला पुण्याकडून चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या मिनी बसचालकाने विरुद्ध दिशेला येऊन धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले होते. यातील आई व मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या अपघातात वीरेंद्र ऊर्फ दिगंबर तुकाराम दिघे (४३, सध्या रा. पिंपळदरी, मूळ रा. रामदास पठार), त्यांची पत्नी वृषाली वीरेंद्र दिघे (४०), मुलगा वेदांत दिघे (८), मुलगी वैभवी दिघे (१०), वैष्णवी दिघे (१४) हे गंभीर जखमी झाले होते. यामधील वेदांत व वृषाली दिघे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर इतर तिघांवर मुंबई येथील रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर विरुद्ध दिशेला जाऊन मिनी बसचालक मिलिंद महाडिक याने समोरून येणाऱ्या कारला धडक दिली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. या मृत्यूस करणीभूत झाल्याप्रकरणी चालक मिलिंद महाडिक याला अटक करून त्याच्याविरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती महाड एमआयडीसी पोलिसांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भोसले हे करीत आहेत.
चांढवे येथे अपघातात आई व मुलाचा मृत्यू
By admin | Published: June 10, 2017 1:15 AM