आई-मुलाची पोलिसांनी घडवली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:34 AM2019-11-12T00:34:50+5:302019-11-12T00:34:54+5:30
अलिबाग परिसरात असलेल्या सुरूची हॅटेलसमोर दीड वर्षाचे मूल रडत असल्याची माहिती अलिबाग पोलीस ठाण्यातील दामिनी पथकाला मिळाली.
अलिबाग : अलिबाग परिसरात असलेल्या सुरूची हॅटेलसमोर दीड वर्षाचे मूल रडत असल्याची माहिती अलिबाग पोलीस ठाण्यातील दामिनी पथकाला मिळाली. दामिनी पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन त्या दीड वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतले. त्या मुलाच्या आईचा पत्ता शोधून काढत त्यांच्या ताब्यात दिले. या वेळी मुलाची काळजी घेणाऱ्या महिला पोलिसांचे पूजा कुमार यांनी आभार मानले.
ओम्कार कृष्णा कुमार (१८ महिने) असे बालकाचे नाव आहे. ओम्कार कुमार आपल्या वडिलांसमवेत फिरण्यासाठी बाहेर पडला होता. परंतु कृष्णा कुमार यांनी नशा येणाºया पदार्थाचे सेवन केले होते. त्यांना नशा जास्त झाल्याने सुरूची हॉटेलच्या आतील गल्लीत कृष्णा आपल्या १८ महिन्यांच्या मुलाला घेऊन पडला. जवळपास दीड तास हा मुलगा घटनास्थळी रडत होता. मात्र त्याच्या जवळ कोणी जात नव्हते. या सर्व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत एका सुजाण नागरिकाने अलिबाग पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. या वेळी दामिनी पथकात ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस शिपाई सोनम कांबळे आणि अक्षता दांडेकर यांना याबाबत पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले. त्यानंतर तत्काळ त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी कृष्णा कुमार हे रस्त्यावर पडले होते तर बाजूला ओम्कार रडत बसला होता. त्यानंतर दामिनी पथकातील अक्षता यांनी त्या बाळाला उचलून घेतले तर सोनम यांनी त्या मुलाला खाऊ देऊन शांत केले. ओम्कारचा पत्ता शोधून काढण्यात व्यत्यय येत होता. मात्र या दोन महिला पोलिसांनी ओम्कारच्या घरचा पत्ता शोधून काढून त्याला त्याच्या आईकडे सुपुर्द केले.