ठाणे - कुंभार समाजातील लुप्त होत चाललेल्या कलेला वाव देण्यासाठी आता लवकरच केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यासमवेत बैठक आयोजित केल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली. गुजरात राज्याच्या धर्तीवर संपूर्ण राज्यभर माती कला बोर्ड स्थापन करण्याच्या त्यांच्या मागणीला प्रभू यांनी सहमती दर्शवली असून त्यासंदर्भात लवकरच बैठक आयोजिली आहे.कुंभार समाजाच्या कला सध्या लुप्त होत चालल्या आहेत. त्यांचा रोजगारदेखील काळाच्या पडद्याआड जाऊ लागला आहे. त्यामुळे त्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि त्यांची कला जिवंत राहावी, यासाठी विचारे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. संपूर्ण देशात आजघडीला सुमारे दोन कोटी कुंभारबांधव आहेत. परंतु, त्यांना आजही रोजगारासाठी झगडावे लागत आहे. राज्यातदेखील शासनाकडून नव्या काही योजना या समाजासाठी हाती घेण्यात आलेल्या नाहीत. रोजगार न मिळाल्याने हा समाज दिशाहीन होऊ लागला आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये मात्र या समाजबांधवांसाठी रोजगाराच्या विविध संधी तेथील सरकारने दिल्या आहेत. गुजरातने मातीकाम कलाकार अॅण्ड रुरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट गांधीनगरद्वारे परंपरागत कुंभार कलेला वाव देण्यासाठी विविध साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
कुंभार समाजासाठी ‘माती कला बोर्ड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 6:30 AM