मयूर तांबडेपनवेल : राजकारणात काहीही व कधीही घडू शकते याचा प्रत्यय रायगड जिल्ह्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत आई आणि लेक या दोघी जणी सरपंच बनल्या आहेत. खालापूर तालुक्यातील आई आणि पनवेल तालुक्यातील त्यांची मुलगी या दोघी सरपंच बनल्या आहेत.जिल्ह्यात २७ मे रोजी ग्रामपंचायतीसाठी निवडणुका पार पडल्या. २८ मे रोजी या ग्रामपंचायतीचा निकाल लागला असून नवनिर्वाचित सरपंचांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला असल्याची माहिती देण्यात आली आहे. खालापूर तालुक्यातील नंदनपाडा ग्रामपंचायत व पनवेल तालुक्यातील कसळखंड ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत सरपंचपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित होते. त्यामुळे नंदनपाडा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास आघाडीतर्फे जनाबाई चंद्रकांत खिरवले यांच्याविरोधात अपक्ष म्हणून जिजाबाई पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढवली. तर पनवेल तालुक्यातील कसळखंड ग्रामपंचायतीत शेतकरी कामगार पक्षातर्फे माधुरी अनिल पाटील यांच्याविरोधात काँग्रेसच्या जागृती पाटील व शिवसेना भाजपाच्या सुरेखा संभाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. ग्रामविकास आघाडीकडून नंदनपाडा ग्रामपंचायतीतून जनाबाई खिरवले या निवडून आल्या आहेत. त्यांनी अपक्ष असलेल्या जिजाबाई पाटील यांचा ३७२ मतांनी पराभव केला तर कसळखंड ग्रामपंचायतीतून माधुरी अनिल पाटील यांनी काँग्रेसच्या जागृती पाटील यांचा १२५ मतांनी पराभव केला. त्यामुळे रायगड जिल्ह्यात या माय-लेकींनी एक वेगळाच विक्र म केला आहे.जनाबाई खिरवले व माधुरी पाटील यांच्या सरपंच निवडीमुळे अनोखा संगम जुळून आला आहे. माय-लेकी एकाच वेळी सरपंच बनल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनल्या आहेत. माय-लेकी आपापल्या ग्रामपंचायतीचा विकास करणार असल्याचे त्यांनीसांगितले.
आईसह मुलगीही झाली सरपंच, माय-लेकीवर शुभेच्छांचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2018 3:10 AM