रायगडमध्ये मोटरसायकल चोरी करणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 12:10 AM2021-03-11T00:10:59+5:302021-03-11T00:11:12+5:30
रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
रायगड : जिल्ह्यातील अलिबाग, पनवेल, उरण, पेण तालुक्यातून मोटरसायकल चोरी करणारी टोळी रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केली आहे. याप्रकरणी अलिबाग आणि उत्तराखंड येथून चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आठ मोटरसायकल जप्त केल्या आहेत. एकूण ३ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
रायगड जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षात वाढ झाली होती. त्यामुळे पोलीस अधीक्षक अशोक दुधे आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी मोटरसायकल चोरांचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला दिले होते. यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली या मोटरसायकल चोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. दोन पथके स्थापन करून चोरांचा तपास सुरू केला होता.
सातत्यपूर्ण तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संकेत जामकर आणि संकेश जाधव या दोन जणांना थळबाजार येथून ताब्यात घेतले. चौकशीनंतर अलिबाग, पेण, पनवेल आणि उरण येथील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून १ बुलेट, १ पॅशन प्रो, १ टीव्हीएस एन्टॉक, १ सुझुकी बॅगमॅन स्ट्रीट आणि एक यामाहा एफ झेड अशा पाच दुचाकी गाड्या हस्तगत करण्यात आल्या. तपासादरम्यान आणखी दोन आरोपी निष्पन्न झाले. त्यांना उत्तराखंड येथून ताब्यात घेण्यात आले. शुभम कश्यप आणि आशिष पन्वार अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून बुलेट, पॅशन प्रो आणि पल्सर अशा ३ गाड्या जप्त केल्या.
पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोलीस उप-निरीक्षक महेश कदम, सहायक फौजदार सी. बी. पाटील, पोलीस हवालदार बंधू चिमटे, पोलीस हवालदार हणमंत सूर्यवंशी, अमोल हंबीर, सचिन शेलार, परेश म्हात्रे, प्रतीक सावंत देवराम कोरम, अनिल मोरे यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
सातत्यपूर्ण तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संकेत जामकर, संकेश जाधव या दोघांना थळबाजार येथून ताब्यात घेतले.