मुंबई-गोवा महामार्गावर माती भरावाचे डोंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 01:43 AM2019-06-11T01:43:24+5:302019-06-11T01:43:45+5:30
वाहनधारकांना होणार मनस्ताप : मुसळधार पाऊस झाल्यास पसरणार चिखलाचे साम्राज्य
पेण : मुुुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठेकेदार कंपनीतर्फे पेण परिसरात ज्या ठिकाणी उड्डाणपुलाचे रेखाटन केलेले आहे त्या ठिकाणच्या पुलाजवळील तब्बल एक किमी लांबीचा मातीच्या भरावाचे डोंगर उभे राहिले आहेत. पेण भोगावती पूल ते रामवाडी रेल्वे पूल या ठिकाणी उंच अशा डोंगराशी स्पर्धा करणारे मातीचे भराव केल्याने पाऊस पडल्यास सरींचा वर्षाव होवून भरावातील माती पाण्याच्या प्रवाहासोबत महामार्गावर पसरून चिखलाचे साम्राज्य पसरणार आहे. या चिखलामुळे प्रवासी वाहने व खाजगी वाहनचालकांना मोठा मनस्ताप होवून प्रसंगी अपघात होण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे.
येत्या बुधवारी हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे महामार्गावर या ठिकाणी संभाव्य धोका ओळखून राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे ही नागरिकांचे व प्रवाशांचे म्हणणे आहे.
२०१० पासून ते २०१९ पर्यंत राष्टÑीय महामार्गाचे काम अतिशय मंद गतीने सुरू असणाºया या कामाला प्रारंभ होवून ८ ते १० वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे. तरीही आज हे काम मंदगतीने सुरूच आहे. या कामातील गती पाहता आणखी दोन वर्षे तरी काम पूर्ण होईल असे चित्र दिसत नाही.
रस्त्यावर डोंगराइतके उंच मातीचे भरावाचे ढीग उभे राहिल्याने महामार्गावरील वाहतूक व्यवस्था जुन्या रस्त्यावरून अतिशय संथ गतीने सुरू आहे. पेण परिसरात तरणखोप, भोगावती पूल, अंतोरा फाटा, रेल्वे स्थानक, रामवाडी पूल ते समर्थनगर हा एक किमी लांबीचा राष्टÑीय महामार्गाचा टप्पा जागोजागी उंच अशा मातीच्या भरावामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस उंच ढीग उभे केल्याने मान्सूनच्या पहिल्या प्रवासात वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजणार आहेत.
पहिल्याच पावसात महामार्गावर वाहतूक कोंडीचे संकट ओढवणार आहे. कारण या मातीच्या भरावावर पावसाचे पाणी पडून पाण्याच्या प्रवाहासोबत होणारी मातीची धूप आणि पसरणारा चिखल यामुळे महामार्ग ठप्प होण्याची लक्षणे सध्या रुंदीकरणाच्या कामामुळे दिसू लागली आहे. याबाबत पोलीस वाहतूक यंत्रणेला सुद्धा मोठा मनस्ताप होणार असून प्रारंभीचा पाऊस धुवाधार झाल्यास परिस्थिती आटोक्यात आणणे अशक्यप्राय व नियंत्रणाबाहेर जाणार असल्याचे संभाव्य चित्र दिसत आहे.
पेण तालुका आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने सुद्धा याबाबीचा अभ्यास न करता दुर्लक्ष केल्याने येत्या पावसाच्या आगमनाबोबरच येणाºया संकटाचा मुकाबला करण्याइतपतची यंत्रणसामुग्री व मनुष्यबळ यांची जमवाजमव करणे अशक्यप्राय होणार असल्याचे चित्र ही दिसत आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने किनारपट्टी भागात ३००किमी लांब व या दाबाचा प्रभाव आहे. या दाबामुळे त्याचे बुधवारपर्यंत वादळात रुपांतर होणार असल्याने समुद्रधुनीतील वादळी वारे रायगडातील समुद्रकिनारपट्टीत हमखास घोंगावणार असल्याने त्यासोबत पावसाचे ही धूमधडाक्यात आगमन होणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजात वर्तविले आहे. सुरुवातीचा पाऊस मुसळधार पडला तर महामार्गावर उभे केलेले मातीचे भरावाचे डोंगरासारखे ढीग या पावसात चिंब भिजून पावसाच्या पाण्याबरोबर वाहत येणारा गाळ मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर पसरून सगळीकडे चिखलाचे साम्राज्य निर्माण होईल. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने उपाययोजना न केल्यास हमरापूर फाटा ते वडखळपर्यंत महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना व या संकटाचा संभाव्य धोका ओळखून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने याबाबतीत सर्वेक्षण करून तातडीने प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे.