रायगड : अडीज महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे हाता-तोंडाशी आलेले तोंडलीचे पीक बाजारात विकता आले नाही. त्यामुळे शेतातच पीक खराब झाल्याने तोंडली उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक भुर्दंड पडला आहे. या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाºयांना दिले.
तोंडलीची विक्री व्यवस्था ठप्प झाल्यामुळे तोंडलीचे पीक हे शेतातच खराब झाले. मालाला उठाव नसल्यामुळे शेतकºयांना ती कवडीमोल दराने ती विकावी लागली. त्यामुळे वर्षाला एकरी लाखाहून अधिक उत्पादन घेणाºया शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे, तरी या तोंडली उत्पादक शेतकºयांना आर्थिक मदतीबरोबरच भरीव अनुदान मिळावे, अशी आग्रही मागणी चंद्रकांत मोकल यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना लेखी निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटून केली आहे.
कृषी विकास यंत्रणा (आत्मा)मार्फत मदत व्हावी, असेही ही मोकल यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. या अनुषंगाने चंद्रकांत मोकल यांनी कोकण विभागाचे सहसंचालक (कृषी) विकास पाटील यांच्या बरोबरही चर्चा करून तोंडली उत्पादकांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली आहे.हजारो हेक्टर क्षेत्रावर घेतात पीक
हमखास उत्पादन देणाºया तोंडलीमध्ये विविध औषधी गुणधर्म आहेत. तोंडली पिकाचे उत्पादन करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, रोहा, पेण या तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर तोंडलीचे पीक घेतले जाते. शेतकरी वर्षानुवर्षे प्रचलित पद्धतीने तोंडलीची शेती करतात. तोंडलीला बाजारात अधिक मागणी असल्यामुळे ती किरकोळ स्वरूपात विकली जाते. ठोक व्यापारासाठी असलेल्या नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये तिची विक्री होते. तेथून मुंबईसह अन्य शहरात, तसेच काही प्रमाणात ती निर्यातही केली जाते.