मुरुड : ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी वर्षाला सहा लाखांपेक्षा जास्त पर्यटक येत असतात. त्यातच सलग सुट्ट्या पडल्या, तर एका दिवसाला २५ हजारांपेक्षा जास्त पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येत असतात. अशा वेळी वाहनांबरोबरच पर्यटकांची अलोट गर्दी जंजिरा किल्ल्यावर होत असते. पूर्वी हा किल्ला विनातिकीट पाहावयास मिळत होता; परंतु काही महिन्यांपूर्वीच पुरातत्त्व खात्याने माणसी २५ रुपये शुल्क आकारण्याची सुरुवात केली आहे. त्यामुळे पर्यटकांना तिकीट काढूनच किल्ल्यात प्रवेश मिळत आहे. या किल्ल्यावरील लोखंडी दरवाजा त्याचप्रमाणे निमुळते प्रवेशद्वार यामुळे पुरातत्त्व खात्याचे तिकीट काढत असताना गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरी व धक्काबुक्कीचे प्रकार घडत आहेत, यामुळे पुरातत्त्व खात्याचे तिकीटघर राजपुरी जेट्टीवर करावे, अशी मागणी होतआहे.
जंजिरा किल्ल्यात प्रवेशासाठी तिकीट काढणारा व्यक्ती हा माणसे मोजून तिकीट काढली जात असल्यामुळे गर्दीच्या वेळी ही प्रक्रिया धीमी होत असल्याने एक तर पर्यटकांच्या गर्दीने तिकीट काढण्याची प्रक्रिया मंदावली असल्याने या प्रकारचा बराच त्रास पर्यटकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुरातत्त्व खात्याने आपले तिकीटघर किल्ल्यावर न ठेवता राजपुरी नवीन जेट्टी येथे करावे. त्यामुळे किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वीच पुरातत्त्व खात्याचे तिकीट काढले जाईल व पर्यटकांना अगदी सहज किल्ल्यात प्रवेश मिळेल, असे पर्यटकांचे म्हणणे आहे. त्यानुसार राजपुरी नवीन जेट्टीवर तिकिटाची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
याबाबत नाशिक येथील पर्यटक मिलिंद सातपुते यांनी जंजिरा किल्ल्यात प्रवेश करताच पुरातत्व खात्याने लोखंडी दरवाजा बसवला आहे. त्यामुळे काहीअंशी जागा त्यामध्ये गेली आहे. त्यातच गर्दीच्या वेळी तिकीट काढताना चेंगराचेंगरी होत असून तिकीट प्रक्रिया धीम्या गतीने सुरू असल्याने पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
तिकीट हे ऑनलाइन असल्याने तिकीट निघण्यास उशीर होतो, ही वस्तुस्थिती सत्य आहे; परंतु वरिष्ठ कार्यालयाकडूनच ही कार्यप्रणाली अवलंबली असल्याने त्याच प्रकारे तिकीट काढले जात आहे. जर पुरातत्त्व खात्यास महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून तिकीटघरासाठी जागा उपलब्ध करून दिली तर आम्ही ही जागा बदलण्यास तयार आहोत, यासाठी स्थानिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.- बजरंग ऐलीकर, पुरातत्त्व खात्याचे अधिकारी