जेट्टीबाबत निर्णय न झाल्यास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 01:32 AM2020-08-08T01:32:28+5:302020-08-08T01:33:08+5:30
प्रकाश सरपाटील यांचा इशारा : मेरिटाइम बोर्डाने सकारात्मक विचार करण्याची मागणी
आगरदांडा : मुंबई येथील मासळीचे मुख्य मार्के ट बंद असल्याने राजपुरी, दिघी, मुरुड, एकदरा येथील मच्छीमारांना मासळी विकता येत नसल्यामुळे पकडलेली मासळी फुकट जात आहे. आगरदांडा येथील जेट्टी मुंबईपासून जवळ असल्याने व मोठ्या बोटींना सोईस्कर असा धक्का असल्याने मुंबईचा बाजार सुरू होईपर्यंत किमान दोन महिन्यांसाठी आगरदांडा येथे मच्छीमारांना जेट्टी उपलब्ध करून द्यावी, यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने सकारात्मक विचार करून जेट्टी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास मोठे आंदोलन होईल, असा इशारा मुरुड तालुका नाखवा संघाचे प्रमुख समन्वयक प्रकाश सरपाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
मुरुड शहरातील जय मल्हार महादेव कोळी समाजगृहामध्ये पत्रकास परिषद घेण्यात आली होती. यावेळी सर्व पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडताना प्रकाश सरपाटील बोलत होते. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडे सहापेक्षा जास्त जेट्ट्या आहेत. आगरदांडा येथे तीन जेट्ट्या असून, त्यातील कोणतीही एक जेट्टी मच्छीमारांना दिल्यास आमचे काम सुकर होणार आहे. मुंबईचे व्यापारी आगरदांडा येथे येण्यास तयार आहेत, परंतु बोटी बंदराला लावून न दिल्यामुळे आमचा माल फुकट जात आहे. व्यापारी आले, तर रोख स्वरूपात व्यवहार झाल्याने क्रयशक्ती वाढणार आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, आमच्या या आंदोलनास तालुक्यातील असंख्य मच्छीमार सोसायट्यांचा पाठिंबा असून, ज्यावेळी आम्ही आंदोलन करू, त्यावेळी त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आगरदांडा इंदापूर या चौपदरी रस्त्यामुळे मुंबई अंतर जवळ झाले असून, मासळीचे घाऊक खरेदीदार येथे येण्यास उत्सुक आहेत. यावेळी जय भवानी मच्छीमार सोसायटीचे चेरमन महेंद्र गार्डी, माहेश्वरी मच्छीमार सोसायटीचे चेरमन धुव्र लोदी, दामोदर बैले आदी मान्यवर उपस्थित होते.
आगरदांडा येथील तीनपैकी एक जेट्टी द्यावी
आगरदांडा जेट्टी प्रशासनाने आम्हाला लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. मच्छीमार बांधव शांत बसणार नाही. प्रवासी जेट्टीमुळे आम्हाला जेट्टी देता येत नाही, असे मेरिटाइम बोर्डाचे म्हणणे असेल, तरी आगरदांडा येथील तीनपैकी कोणतीही एका जेट्टीची मागणी करीत आहोत. तीन जेट्टींपैकी दोन जेट्टींचा वापर होत आहे. एक जेट्टी मच्छीमारांना देण्यास काय हरकत आहे. आम्ही या संदर्भात मत्स्य विभागाचे कॅबिनेट व राज्यमंत्री यांच्याशीही संपर्क साधत आहोत, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही मंत्री क्वारंटाइन असल्याने संपर्क झाला नाही, असे सरपाटील म्हणाले.
२५ कोटींच्या उलाढालीचा दावा : एकदरा, राजपुरी, दिघी व मुरुड परिसरातील सुमारे दोनशे होड्या मोठ्या स्वरूपात मासळी घेऊन आल्याने महिन्याला सुमारे २५ कोटी रुपयांची उलाढाल होणार असल्याचा दावा यावेळी सरपाटील यांनी केला आहे. याचा फायदा स्थानिक मच्छीमारांनाच होणार असल्याचे स्पष्ट के ले.