एलईडी फिशिंगमुळे पारंपरिक मासेमारीला धोका , कोळी बांधवांचा बोडणी येथील सभेत आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 03:06 AM2018-02-10T03:06:22+5:302018-02-10T03:06:34+5:30
केंद्र आणि राज्य सरकारने ‘एलईडी लाइट फिशिंग’वर कायमस्वरूपी बंदी घालावी, अन्यथा पारंपरिक मच्छीमारी करणारे कोळी बांधव अत्यंत उग्रआंदोलन पुकारतील आणि त्यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्यास जिल्हाधिकारी जबाबदार असतील, असा संतप्त इशारा उरण, अलिबाग, मुरुड, रेवस-बोडणी येथील कोळी बांधवांनी बोडणी येथे झालेल्या मच्छीमार सहकारी संस्था प्रतिनिधींच्या सभेत दिला आहे.
अलिबाग : केंद्र आणि राज्य सरकारने ‘एलईडी लाइट फिशिंग’वर कायमस्वरूपी बंदी घालावी, अन्यथा पारंपरिक मच्छीमारी करणारे कोळी बांधव अत्यंत उग्रआंदोलन पुकारतील आणि त्यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्यास जिल्हाधिकारी जबाबदार असतील, असा संतप्त इशारा उरण, अलिबाग, मुरुड, रेवस-बोडणी येथील कोळी बांधवांनी बोडणी येथे झालेल्या मच्छीमार सहकारी संस्था प्रतिनिधींच्या सभेत दिला आहे. या संदर्भातील निवेदने लवकरच जिल्हाधिकाºयांना देण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.
मोठ्या मच्छीमारी ट्रॉलर्सच्या माध्यमातून समुद्रात मच्छीमारी करताना आता, या ट्रॉलर्सवर बसविण्यात आलेल्या मोठ्या जनरेटरच्या माध्यमातून ट्रॉलर्सच्या पाण्यातील भागाला एलईडी लाइट लावण्यात आले आहेत. हे लाइट लावल्यावर समुद्रातील छोटी-मोठी मासळी या लाइटना आकर्षित होते आणि जाळ््यात मोठ्या प्रमाणात अडकतात; परंतु या एलईडी लाइट मच्छीमारी तंत्रामुळे उरण, अलिबाग, मुरुड, रेवस, बोडणी येथील समुद्रातील माशांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. परिणामी, या परिसरात मासळीचा दुष्काळ निर्माण होऊन पारंपरिक मच्छीमार बांधवांवर उपासमारीचीच पाळी आली असल्याची परिस्थिती मल्हारी मार्तंड मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने रेवस-बोडणी येथील साईबाबा मंदिराच्या पटांगणात आयोजित सभेत विशद करण्यात आली.
सभेला रेवस-बोडणी मच्छीमार संस्थेचे चेअरमन विश्वास नाखवा, व्हाइस चेअरमन बाळनाथ कोळी, महाराष्टÑ मच्छीमार कृती समितीचे सेक्रेटरी उल्हास वाटकरे, जिल्हा कार्याध्यक्ष बी. एन. कोळी, शिवदास नाखवा (करंजा), खलाशी संघटना अध्यक्ष विश्वनाथ म्हात्रे, जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष शेषनाथ कोळी, राजेंद्र कोळी, गैनी नाखवा (बोडणी), थळ मच्छीमार सोसायटीचे चेअरमन देवेश साखरकर, वरसोली सोसायटी चेअरमन धर्मा घाटकर, सासवणे मच्छीमार सोसायटीचे चेअरमन एकनाथ नाखवा, अलिबाग, मुरुड, उरण, रेवस, बोडणी येथील कोळी बांधव उपस्थित होते.
दुष्काळजन्य परिस्थितीमुळे बोटी नांगरल्या
एलईडी लाइट फिशिंगमुळे पारंपरिक मासेमारी पूर्णपणे धोक्यात आली असून, रेवस-बोडणीच्या समुद्रात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने येथील कोळी बांधवांनी आपल्या बोटी बंदरात नांगरून ठेवल्या आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली, तर कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ येणार आहे, याची दखल शासनाने वेळीच घेऊन याबाबत लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी या सभेत कोळी बांधवांकडून करण्यात आली.