अलिबाग : तालुक्यातील विर्त-सारळ ग्रामस्थांची कोट्यवधी किमतीची गुरचरण जमीन खासगी बिल्डरच्या घशात घालण्यात आली आहे. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या जागेच्या मोजणीला बुधवारी विरोध केल्याने पोलिसांनी ग्रामस्थांनाच रोखल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गुरचरण जमीन ही गावठाण विस्तारासाठी वापरण्यात येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने जमीन विक्रीचा व्यवहार रद्द करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.विर्त-सारळ हे रेवस आणि मांडवा या बंदराला खेटून असणारे गाव आहे. प्रत्येक गावासाठी गुरचरण जमिनी दिलेली असते. विर्त-सारळ गावासाठी तब्बल साडेतेरा एकर जमीन वाट्याला आलेली आहे. या जमिनीवर सुमारे दीडशे वर्षांपासून ग्रामस्थांचा हक्क आहे. मध्यंतरी काही दलालांनी पंचांची नावे वगळून आपली नावे सातबारावर लावली. त्यानंतर ग्रामस्थांना अंधारात ठेवून एका खासगी बिल्डरला विकण्यात आली असे आगरी शेतकरी प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.अलिबाग तालुका हा एमएमआरडीए क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे येथील जमिनीला मुंबई-नवी मुंबई सारखा कोट्यवधी रुपयांचा दर आला आहे. हेच उद्दिष्ट डोळ््यासमोर ठेवून दलालांनी गुरचरण जमिनीचा व्यवहार करून जमीन खासगी बिल्डरच्या घशात घातल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या या जमिनीचा बाजारभावानुसार सुमारे २६० कोटी रुपयांचे मूल्य होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यामध्ये विविध सरकारी अधिकारी, दलाल यांचे हात ओले झाले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तातडीने जमिनी विक्रीचा व्यवहार रद्द करून ग्रामस्थांना द्यावी, अशी मागणी राजाराम पाटील यांनी यावेळी केली.बुधवारी लावण्यात आलेल्या जमीन मोजणीला ग्रामस्थ विरोध करणार असल्याचे लक्षात घेऊन प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात केला होता. ग्रामस्थांनी याही परिस्थितीत मोजणीला प्रखर विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखून तो हाणून पाडला. त्यामुळे त्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.गाव विस्तारासाठी केली होती जागेची मागणीगुरचरण जमीन ही संबंधित गावाच्या विस्तारासाठी असते. त्याचप्रमाणे याच जमिनीचा वापर पिढ्यानपिढ्या गुरांना चरण्यासाठी, गोठे बांधणे, काही प्रमाणात शेतीचा व्यवसायही करण्यासाठी केला जातो. गावातील कुटुंबांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गावाचे विस्तारीकरण गुरचरण जागेत करावा अशी मागणी जिल्हा प्रशासन आणि भूमिअभिलेख विभागाकडे केली होती मात्र त्यांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही, असे विर्त सारळ ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रवीण वार्डे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.ग्रामस्थांवर खोट्या तक्रारी दाखल करून त्रास दिला जात आहे. या जागेबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे असे असताना प्रशासनाने जमिनीची मोजणी करणे बेकायदेशीर असल्याचे अॅड.राकेश पाटील यांनी लोकमतला सांगितले.
जागा वाचवण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:00 PM