निवडणूक - बिरवाडीत शीघ्र कृती दलाच्या तुकडीने केले संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 02:00 AM2021-01-10T02:00:29+5:302021-01-10T02:01:32+5:30

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज

Movements were carried out by the Rapid Action Force in Birwadi | निवडणूक - बिरवाडीत शीघ्र कृती दलाच्या तुकडीने केले संचलन

निवडणूक - बिरवाडीत शीघ्र कृती दलाच्या तुकडीने केले संचलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत असून या कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
निवडणूक कालावधीत मतदारांना भयमुक्त वातावरणात मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता पोलीस यंत्रणेकडून विशेष खबरदारी घेतली जात असून याचाच एक भाग म्हणून पोलीस दलाच्या शीघ्र कृती दलाच्या जवानांनी बिरवाडी कुंभारवाडा किनारा ते बिरवाडी बाजारपेठमार्गे बिरवाडी पोलीस चौकीपर्यंत शनिवारी संचलन केले. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश तांबे, प्रभारी अधिकारी पंकज गिरी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीमध्ये ६ वॉर्डमध्ये १७ जागांकरिता ४१ उमेदवार रिंगणात उतरले असून ५,५७७ मतदार  मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, या राजकीय पक्षांचे पुरस्कृत उमेदवार व अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक रंगतदार होणार असून या कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा दावा पोलीस यंत्रणेकडून करण्यात आला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश तांबे यांच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तशा पद्धतीच्या नोटिसा संबंधितांना बजावण्यात आल्या आहेत.

राजकीय गणिते बदलण्याची शक्यता
n महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप यांच्याकरिता बिरवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असल्याने या निवडणुकीमध्ये गोगावले विरुद्ध जगतापांचा राजकीय संघर्ष प्रचारसभांच्या माध्यमातून पाहावयास मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
n ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेना पुरस्कृत उमेदवार विरुद्ध काँग्रेस पुरस्कृत उमेदवार यांच्यामध्ये काटे की टक्कर होणार असली तरी राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार व भाजप पुरस्कृत उमेदवारांमुळे प्रस्थापितांची राजकीय गणिते बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Movements were carried out by the Rapid Action Force in Birwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड