खासदाराला व्हिजन असणे गरजेचे, गीते यांच्यावर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 04:30 AM2019-04-06T04:30:42+5:302019-04-06T04:31:19+5:30
सुनील तटकरे यांचे प्रतिपादन : मुरुड तालुक्यातील तेलवडे येथे सभा; गीते यांच्यावर टीका
मुरु ड : एक प्रभावी खासदार म्हणून काम करताना जनतेला आपण पुढील काळात काय देणार आहोत याचे व्हिजन असणे खूप आवश्यक आहे. जर मी रायगडचाखासदार म्हणून निवडून आलो तर कोकणाला जोडणाऱ्या सर्व सागरी महामार्ग केंद्राकडून पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करणार. यामधूनच रोजगार निर्मिती करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी संकल्पित केलेला रेवस रेड्डी मार्ग, बाणकोट-मंडणगड पुलाची निर्मिती करणे, आगरदांडा-दिघी पुलाचे निर्माण करून महत्त्वाचे जिल्हे एकमेकांना जोडून प्रवासाचे अंतर व त्यातून रोजगार निर्मिती करणार असल्याचे या वेळी रायगड लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी तेलवडे येथे के ले.
या वेळी सुनील तटकरे म्हणाले की, गीते यांच्या विकासकामांच्या पुस्तिकेत ज्यांना त्यांनी आरोग्यविषयक सुविधा मिळवून दिली त्यांचा तुम्ही उल्लेख करता हे माणुसकीला धरून नाही. मतदार संघातील मतदारांना अडचणीच्या वेळी मदत करणे हे त्या लोकप्रतिनिधींचे कामच आहे; परंतु आरोग्यसेवा दिली म्हणून विकासकामांच्या पुस्तिकेत उल्लेख करणे योग्य नसल्याचे मत या वेळी त्यांनी व्यक्त केले. गीते माझ्यावर आरोप करतात की, माझ्यावर मनी लॉण्डरिंगची केस दाखल आहे, मी सिंचन प्रकरणातसुद्धा गुंतलो आहे. जर माझ्यावर केस दाखल आहे मग अर्जाची छाननी होती तेव्हा गीते यांनी हरकत का घेतली नाही? त्यांच्याकडे माझ्याविषयी पुरावे होते मग त्यांनी ते का निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे मांडले नाही. माझा अर्ज बाद होऊन आपण बिनविरोध निवडून आले असते; परंतु कोणताही पुरावा नसल्याने गीते यांना गप्प बसावे लागले, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.
रायगड लोकसभा मतदार संघातील जनता निष्क्रिय खासदार अनंत गीते यांच्या कारभाराला कंटाळली आहे. मुरुड, माणगाव व अन्य भागात गीतेंनी फक्त सार्वजनिक शौचालय बांधले तेसुद्धा कंपन्यांच्या सी.एस.आर फंडातून, या खासदाराला केंद्रातून एकही कारखाना आणता आला नाही. बेरोजगारी कमी करता आली नाही असा आरोप तटकरे यांनी के ला. या वेळी तेलवडे ग्रामपंचायतीमधील कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, तालुका महिला अध्यक्ष नेहा पाके आदी उपस्थित होते.