अलिबाग : छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा होत असताना राजशिष्टाचार पालन न झाल्याने आणि निमंत्रण असून भाषण करण्यास दिले नसल्याचे कारण देत रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे हे कार्यक्रमातून तडकाफडकी निघून गेले. सोहळ्यास आलेल्या मान्यवरांचे यथायोग्य सन्मान केला असून, खासदार सुनील तटकरे यांचाही केला होता. मात्र, चांगल्या कार्यक्रमात गालबोट लावण्याची विरोधकांची परंपरा आहे. खासदार हे कार्यक्रमास नसते आले तरी चालले असते अशी प्रतिक्रिया आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज याच्या शिवराज्यभिषेक सोहळ्याला यंदा ३५० वर्षे पूर्ण होत आहे. शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयातर्फे किल्ले रायगडावर कार्यक्रम घेण्यात आला. या सोहळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, मान्यवर यांनाही आमंत्रित केले होते. सांस्कृतिक विभागातर्फे हा कार्यक्रम होत असताना त्याचे स्वागताध्यक्ष हे त्या खात्याचे मंत्री सुधीर मुनगुंटीवार आहेत. मात्र, स्वागताध्यक्ष आमदार भरत गोगावले यांना करण्यात आले आहे.
नियमांचे पालन केलेले नाहीशिवराज्यभिषेक सोहळ्याचे खासदार म्हणून सुनील तटकरे यांना निमंत्रण देण्यात आले होते. मी एक शिवप्रेमी म्हणूनही कार्यक्रमास उपस्थित होताे. मात्र, कार्यक्रमात राज शिष्टाचार नियमांचे पालन न केल्याने आणि कार्यक्रम शासनाचा असताना काही जण स्वतः कार्यक्रम करीत असल्याचा आव आणत असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे. तर विरोधकांना चांगल्या कामात विघ्न आणण्याची सवय आहे. कार्यक्रमास नसते आले तरी चालले असते, अशी प्रतिक्रिया आमदार भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.