इंदापूर तालुका पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जाईल: खासदार सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 06:27 PM2021-11-04T18:27:43+5:302021-11-04T18:29:48+5:30
उजनी जलाशयावरील पक्षी यामुळे पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
कळस: साखर कारखानदारी व दुधासाठी ओळखला जाणारा इंदापुर तालुका वनीकरणातील जैवविविधता, उजनी जलाशयावरील पक्षी यामुळे पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
कडबनवाडी (ता.इंदापूर) येथील वन उद्यानाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. इंदापूर तालुक्यात फक्त दूध व साखर उत्पादन अशी ओळख असायची मात्र उजनी जलाशयाचा परिसर भिगवन येथील पक्ष्यांचे आश्रयस्थान गंगावळण येथील पर्यटन केंद्र व कडबनवाडी येथील चिंकारा अभयवन यामुळे तालुक्याची ओळख टुरिझम स्पॉट म्हणून झाली आहे. तालुक्याचा विकास महाविकास आघाडी च्या माध्यमातून राज्यमंत्री भरणे करीत आहेत वनीकरण महत्वाचे आहे मात्र अन्नदाता शेतकरी देखील जगला पाहिजे. त्यामुळे शेती आणि वन याचा समतोल राखला जाईल.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तालुक्यात एक हजार कोटीची कामे करण्यात आली. साडेतीन कोटी रुपये इंदापूर तालुक्यातील वनविकासासाठी आणले असून जलसंधारणाच्या कामाला देखील गती देण्यात आली आहे.
यावेळी सुळे व भरणे यांनी कडबनवाडी ऑक्सीजन पार्कची पाहणी, वृक्षारोपण केले. प्रास्ताविक उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केले चिंकारा वनीकरणाची माहिती भजनदास पवार यांनी दिली. यावेळी प्रतापराव पाटील,सचिन सपकाळ, तालुका वनपरिक्षेत्राधिकारी अजित सूर्यवंशी ,कडबनवाडी चे सरपंच दादासाहेब जाधव उपसरपंच आप्पासाहेब गावडे,श्रीकांत करे ,उपस्थित होते आभार ॲड लक्ष्मणराव शिंगाडे यांनी मानले.