चौऱ्याऐंशी गावांची रक्षणकर्ती विन्हेरेची श्री झोलाईमाता
By admin | Published: October 9, 2016 02:52 AM2016-10-09T02:52:39+5:302016-10-09T02:52:39+5:30
महाडपासून २२ किमी अंतरावरील विन्हेरे येथील श्रीदेवी झोलाईमातेचा महिमा अगाध आहे. महाडचं आराध्यदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री वीरेश्वर महाराजांची लाडकी
महाड : महाडपासून २२ किमी अंतरावरील विन्हेरे येथील श्रीदेवी झोलाईमातेचा महिमा अगाध आहे. महाडचं आराध्यदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री वीरेश्वर महाराजांची लाडकी बहीण म्हणून श्रीदेवी झोलाईमातेची खरी ओळख आहे. या देवीचा नवरात्रौत्सव परंपरागत पद्धतीने साजरा केला जातो. संकटकाळात भक्तगणांची रक्षण करणारी चौऱ्याएेंशी गावांची रक्षणकर्ती असा या झोलाईमातेचा लौकिक आहे.
नवरात्रौत्सवास नतमस्तक होण्यासाठी पंचक्रोशीतील माहेरवाशीणींसह महाड, पोलादपूर तालुक्यातील असंख्य भक्तगण विन्हेर येथे हजेरी लावतात. झोलाईमातेच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. ही झोलाईदेवी नाशिकच्या सप्तशृंग देवीचा अवतार असून, तिचे सप्तशृंगी गडावर शक्तिपीठ असल्याचे वर्णन करण्यात आलेले आहे. तसेच हे देवस्थान देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकीच अर्धे पीठ असून, ती नाथांची जननी आहे. तिनेच नाथांना साबरी विद्या दिली आणि तिथूनच पुढे ती कोलकात्याला गेली व त्या ठिकाणी दक्षिणेची महाकाली (दक्षिणेश्वरी) म्हणून स्थापित झाली. त्यानंतर महाराष्ट्रात दक्षिणेला आली ती कोल्हापूरला आणि काळूबाई म्हणून मांढरगडावर विराजमाण झाली. त्यानंतर पुढे कोकणात दाखल झाली. भराडीदेवी हे तिचं अखेरचं शक्तिपीठ मानलं जाते. ती सर्वांना सांभाळून घेते अशी भक्तगणांची भावना आहे. काळूबाई, झोलाई आणि जननती या तिन्ही देवतांची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या ठायी उत्पत्ती, स्थिती आणि लय अशा त्रिगुणांचा वास आहे.
महाडच्या वीरेश्वर छबिना उत्सवाच्या काळात विन्हेरेच्या श्रीझोलाई देवीचे स्थान असते. छबिन्याच्या दिवशी पंचकोशीतील अनेक ग्रामदेवतांच्या पालख्या लाडक्या वीरेश्वराला भेटीसही येतात. त्या वेळी सर्वांत महत्त्वाचा मान हा झोलाईदेवींचा असतो.